top of page

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

डोंबिवली – ३, ४, ५ फेब्रुवारी, २०१७

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत होत आहेत. "साहित्य" सकल मानवी अभिव्यक्तीचा हुंकार !... त्यातही मराठी साहित्य रसाळ, मधाळ, बहुढंगी, बहुरंगी, अनेक प्रवाह प्रतिप्रवाहांचं सुंदर मिश्रणच !!! संतपरंपरेतील विविध संतांच्या गाथा, अखंड, अभंग, ओव्या, दोहे असोत अथवा नवमतवादी वैचारिक, ललित साहित्य - जीवनानुभव समृध्द करणारं संजीवन म्हणजे मराठी साहित्य ! येत्या वर्षात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली मध्ये भरवण्यात येतंय. डोंबिवलीच्या सांस्कृतिक इतिहासातली ही एक बहुमोल अशी घटना आहे. डोंबिवलीच्या लोकजीवनातील अनेक संस्कृतींचं झालेलं मिश्रणं हीच डोंबिवलीची संपत्ती आहे. डोंबिवलीचे सांस्कृतिक स्थळे आणि प्रतिके तिची शक्तीस्थानेही आहेत. ह्या सर्वांचं प्रतिबिंब ह्या संमेलनातून घडेल यात शंका नाही आणि म्हणूनच संमेलनाचं बोधचिन्ह बनवताना त्याचा वापर अपरिहार्य ठरला. बोधचिन्हातील महत्त्वाची आकृती ग्रंथाची पाहावयास मिळते; परंतु हा काही बासनात गुंडाळलेला ग्रंथ किंवा चोपडी नव्हे, तर साहित्यातील समृद्ध अनुभवविश्वाचा अविष्कार आहे आणि म्हणून खुला ग्रंथाच जास्त संयुक्तिक ठरला. बोधचिन्हात समाविष्ट गणपती मंदिराचा कळस डोंबिवलीच्या अशाच शक्तिस्थानांपैकी एक ! डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख बनलेल्या ह्या मंदिराचा कळस बोधचिन्हाला मांगल्य मिळवून देतो. सरस्वती आणि लेखणीचा संगम साहित्याच्या उद्धिष्टाला अधोरेखित करतो. ज्ञान आणि संस्कृतीचा एकत्रित परिणाम म्हणजे साहित्य. मानवाच्या जीवनानुभवांना पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवण्याचं उद्धिष्ट इथे स्पष्ट होते. ह्या संचिताचा वापर करूनच तर मानव इथपर्यंत पोहचला आणि आणखीन पुढल्या प्रवासातही हीच शिदोरी तो घेऊन चालला आहे. डोंबिवली ज्या जिल्ह्यात येते त्या ठाणे जिल्ह्याची ओळख म्हणजे वारली चित्रे ! त्याचा अत्यंत समर्पक वापर बोधचिन्हात केला गेला आहे. एकिकडे वारली चित्रांचा समावेश करून ह्या चित्रांनाही आपण साहित्याचाच दर्जा देतो, कारण अखेर चित्र आणि शब्द दोन्हीचे साध्य एकच - 'मानवी अनुभूतींचं प्रकटीकरण', शब्दांनी जे साधत नाही ते काही वेळा चित्रं सध्या करतात. एका पिढीकढून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा नेण्याचं काम या चित्रांनी गेली अनेक शतके केलं आहे. दुसरीकडे त्यातली मानवाकृती ग्रंथाला तोलून धरताहेत असा भास होतो तोही किती सार्थ आहे ! माणूस आणि त्याचं जगणं हेच साहित्याचा आधार नाही का? त्यादृष्टीनेही ह्या चित्रांचा वापर अत्यंत परिमाणकारक आहे. बोधचिन्हात वापरण्यात आलेली रंगसंगतीही बोधचिन्हाच्या परिणामाला अधिकाधिक खोल अर्थ प्रदान करते. माती आणि आकाश ह्या दोघांचाही रंग बोधचिन्हात पाहायला मिळतो. आकाशाइतकं उतुंग मराठी साहित्याची मुळं मात्र इथल्या मातीतच खोल रुजलेली आहेत. सोनेरी रंग श्रीमंतीचं प्रतिक आहे. मराठी साहित्याच्या सोनेरी इतिहासाची हा रंग ग्वाही देतो आणि उज्ज्वल भविष्याची हमी !

प्रतिनिधींची नावनोंदणी 

संमेलन प्रतिनिधी: 

१. शुल्क रु. ३०००/- फक्त ३ दिवस निवासासहित भोजन व नाश्ता

२. शुल्क रु. १५००/- फक्त ३ दिवस भोजन व नाश्ता (निवासाव्यतिरिक्त).

ग्रंथ प्रदर्शनात गाळा / गाळे मिळण्यासाठी अर्ज

गाळे आरक्षणासाठी नोंदणी शुल्क रु. ६०००/- आहे. गाळ्यासाठी नोंदणी २० डिसेंबर, २०१६ पासून सुरु होईल. अर्ज भरुन १० जानेवारी, २०१७ पर्यंत शुल्कासह जमा करावेत.

bottom of page