मसाप आणि विश्वकोश निर्मिती मंडळात सामंजस्य करार- मसापला ज्ञानमंडळ म्हणून मान्यता

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने आपल्या कामासाठी विविध विद्यापीठे व शैक्षणिक, संशोधन संस्था यांच्या सहयोगातून विविध विषयावरील ज्ञानमंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेची साहित्य या विषयावरील ज्ञानमंडळ म्हणून निवड केली. त्या संदर्भातला सामंजस्य करार झाला. या करारावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सचिव सुवर्णा पवार यांनी स्वाक्षर्या केल्या यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप करंबेळकर, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोष्याध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर, प्रमोद आडकर, माधव राजगुरू उपस्थित होते.
दिलीप करंबळेकर म्हणाले महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. मराठी भाषा आणि साहित्य यांच्या जतन आणि संवर्धनासाठी ही संस्था ११० वर्ष निष्ठेने काम करत आहे, त्यामुळे साहित्य या विषयासाठी परिषदेची ज्ञानमंडळ म्हणून निवड करताना विशेष आंनद होत आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले- ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंकलन आणि ज्ञानसंवर्धन यासाठी विश्वकोश निर्मिती मंडळाने मसापची ज्ञानमंडळ म्हणून निवड करून जो विश्वास दाखविला आहे, तो सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करू. ज्ञानमंडळ या नात्याने साहित्य या विषयाच्या विश्व्कोश निर्मितीसाठी सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा मसापतर्फे उपलब्ध करून दिल्या जातील.