गोनीदांचे दुर्गसाहित्य हे दुर्गकीर्तनच : डॉ. विजय देव
'मसाप' तर्फे गोनिदांच्या जन्मशताब्दीनिमित्त व्याख्यान

गोनिदांनी आपले एक तृतीयांश आयुष्य दुर्ग भ्रमंतीसाठी वेचले. दुर्ग कसे पाहावेत ? का पाहावेत ? दुर्ग आणि इतिहास यांचा अनुबंध काय याचे महाराष्ट्राला प्रथम मार्गदर्शन करून अक्षरशः दुर्ग जागरण केले. ते केवळ दुर्ग भक्त नव्हते तर ते दुर्गमय झाले होते. त्यांचे दुर्ग साहित्य हे दुर्गकीर्तनच आहे. असे मत डॉ. विजय देव यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने गोनिदांच्या जन्मशताब्दीवर्षा निमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, लेखिका डॉ. वीणा देव उपस्थित होते.

देव म्हणाले, गोनिदांनी महाराष्ट्रातील ५३० किल्ल्यांपैकी किमान साडेतीनशे किल्ले अनेक वेळा केवळ पाहिले नाहीत तर समरसून अनुभवले. त्यांनी ललितसाहित्याखालोखाल दुर्गाविषयी लिहिले. त्यांचे शिवप्रेम दुर्गप्रेमातून निर्माण झाले.
प्रा. जोशी म्हणाले, "गोनिदा हे बहुमुखी प्रतिभावंत होते. त्यांनी आपल्या लेखनातून शाश्वत मूल्यांची पूजा बांधली. कालप्रधानता आणि समाजदर्शनामुळे गोनिदांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या वेगळ्या ठरतात. समकालीन जीवनाची रुपे साहित्यातून मांडण्याचे काम तुलनेने सोपे असते. पण जो काळ पूर्वसुरींच्या अभिजात साहित्यकृतीतून आणि इतिहासातल्या पानापानातून धुक्याचे अनेक पदर लपेटून उभा आहे तो विश्वसनीयरित्या वाचकांसमोर उभा करणे हे मोठे आव्हान असते ते गोनिदांनी समर्थपणे पेलले. त्यांच्या कादंबऱ्यांचे गारूड आजही वाचकमनावर कायम आहे." दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.