मसाप ब्लॉग  

समाजमनाचे पापुद्रे मी कथेतून उलगडले 'मसाप'च्या 'कथासुगंध' कार्यक्रमात ह. मो. मराठे१९४५ ते १९७५ हा सुमारे तीस वर्षांचा कालखंड मराठी साहित्यात नवकथेचा कालखंड म्हणून ओळखला जातो. कथेतील पात्रांच्या अंतर्मनाचे पापुद्रे उलगडून दाखवण्याचे काम नवकथाकार प्रामुख्याने करीत असत. मी १९७० च्या सुमारास कथालेखन सुरु केले. मला वाटले की, आपण समाजमनाचे पापुद्रे कथेतून उलगडून दाखवावे. या प्रेरणेतून माझे पुष्कळसे कथालेखन झाले आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक ह. मो. मराठे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या उपक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिन जोशी व प्रमोद काळे यांनी ह. मो. मराठे यांच्या न्यूजस्टोरी या कथेचे अभिवाचन केले. त्यानंतर ह. मो. मराठे यांनी कथेमागची कथा उलगडून श्रोत्यांना सांगितली.

आपल्या या कथेच्या निर्मितीची पार्श्वभूमी सांगताना ह. मो. मराठे पुढे म्हणाले, "ही कथा मी १९८१ मध्ये लिहिली. याच कथेवरचे 'दोन स्पेशल' हे नाटक गेल्या वर्षी रंगमंचावर आले असून ते सध्या गाजत आहे. या कथेचा त्या वर्षीच्या दिवाळी अंकातील सर्वोत्कृष्ट कथेचा रु. एक हजारचा ग. दा. बाळ पुरस्कार पुरस्कार मिळाला होता. 'अक्षर दिवाळी' या दिवाळी अंकातील उत्कृष्ट साहित्याच्या संचयातही या कथेचा समावेश झाला होता. कथेची निर्मिती प्रक्रिया सांगताना ह. मो. मराठे म्हणाले, "मी त्यावेळी किर्लोस्कर मासिकांच्या कार्यालयात उपसंपादक म्हणून काम करीत होतो. पण मला त्या आधीचा दैनिक वर्तमानपत्रातील कामांचा अनुभव होता. रात्रपाळीचा मुख्य उपसंपादक म्हणूनही मी काम केले होते. त्या काळातले वर्तमानपत्राच्या कार्यालयातले रात्रपाळीचे वातावरण मला उत्तमरित्या माहीत होते. त्याचा उपयोग या कथेचे लेखन करताना झाला. घटनेतील दुसरी बातमी मला अर्धवट झोपेत सुचली. ताबडतोब उठून मी कथा पूर्ण करून टाकली. मराठी कथाकादंबर्यांचे अनेक नायक दोन बायकांच्या पेचात सापडलेले आढळतात. 'न्यूज स्टोरी' चा नायक दोन बातम्यांच्या पेचात सापडला आहे ! पुनर्लेखन ही गोष्ट जशी कथेला कसदार करते. तशी ती अनेकदा कथा बिघडवूनही टाकते. प्रत्येक कथाकाराची अनुभवाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते त्यामुळे निर्मितीची प्रक्रिया आणि विषय एकच असूनही कथाकारांकडून वेगवेगळ्या कथा निर्माण होतात. वि. दा. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.


Featured Posts
Recent Posts