संशोधनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनदृष्टी रुजविणे गरजेचे : डॉ. अरुणा ढेरे 'मसाप' आयोजित
विद्यापीठ आणि महाविद्यालये यांच्या मधले संशोधन आज समाधानकारक नाही. ते नोकरीतल्या प्रगतीशी जोडलेले आहे आणि त्याच्या संख्यात्मक वाढीशी गुणांचे / दर्जाचे प्रमाण व्यस्तच आहे. ही स्थिती बदलणे आपल्या हाती आहे. आपल्या वैयक्तिक संशोधनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनदृष्टी रूजणेही आवश्यक आहे.

एक काळ असा होता, आणि तो फार जुना काळ नव्हे, ज्ञानजगतावर प्राध्यापकांचा मोठा प्रभाव होता. शिक्षकीपेशा हा व्यवसाय नव्हे तर ज्ञानवृत्ती होती, तो ध्यास विषय होता, कर्तव्य, जबाबदारी आणि अभिमानाची भावना त्याच्याशी निगडित होती. शिक्षक असणे ही केवळ उपजीविकेची नोकरी नव्हती. समर्पित आणि तळमळीच्या शिक्षकांची संख्या तुलनेने मोठी होती.
मास्तर ही पदवी मानाची होती अशा काळात विद्यार्थ्यांच्या पिढ्या शिक्षकांच्या ऋणात होत्या. व्यासंगी प्राध्यापकांना वाङ्मयव्यवहारात मानाचे स्थान होते. आज अपवाद वगळता हे चित्र फारसे आनंददायक नाही. समाजमनात पूर्वी शिक्षक-प्राध्यापकांविषयी सार्वत्रिक पूज्यबुद्धी किंवा आदर भावना होती तशी आज दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र बदलणे आपल्याच हाती आहे. व्यासंगी आणि विद्वान अध्यापक किंवा सृजनशील अध्यापक समाजाचे बौद्धिक नेतृत्व करण्यासाठी पुढे आले आहेत, असा काळ निर्माण करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी जे जे आवश्यक ते ते कष्ट करण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.
असे मत प्रसिद्ध कवयित्री आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभाग प्रमुख डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. मसापच्या वतीने आयोजित मराठी विषय शिकवणार्या प्राध्यापकांच्या स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या, यावेळी व्यासपीठावर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रा.डॉ. मनोहर जाधव, मेळाव्याचे समन्वयक डॉ. संदीप सांगळे आणि डॉ. वर्षा तोडमल उपस्थित होते. डॉ. मनोहर जाधव म्हणाले, प्राध्यापकांनी अभ्यास आणि व्यासंग वाढविणे गरजेचे आहे तसेच प्रयोगशील होणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ अभ्यासक्रमापुरता विचार करून चालणार नाही.
प्रा. जोशी म्हणाले, 'साहित्य परिषद साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करणाऱ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक वाङमयमंडळे आणि कला शाखेतील विध्यार्थ्यांबरोबरच वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना साहित्य परिषदेशी जोडण्यासाठी मसाप पुढाकार घेणार आहे. यावेळी डॉ. अनिल सहस्रबुद्धे, डॉ. मनोहर जाधव, डॉ. राजाभाऊ भैलूमे, डॉ. राजेंद्र थोरात, डॉ. मृणालिनी गायकवाड, डॉ. वि. दा. पिंगळे यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ. संदीप सांगळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.