सौंदर्यसाधना ही आता फक्त श्रीमंतांची मिरासदारी नाही : डॉ. मधुसूदन झंवर

सौंदर्यसाधना ही आता फक्त श्रीमंतांची मिरासदारी नाही तर जनसामान्यांमध्ये या विषयी जागृती येत आहे म्हणूनच सर्वांगिण सौन्दर्यसाधनेविषयी परिपूर्ण माहिती ही काळाची गरज आहे, ही गरज पूर्ण करणारे हे पुस्तक म्हणूनच अतिशय मोलाचे आहे, असे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांनी सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, डॉ. शकुंतला क्षीरसागर पुरस्कृत कै. विलास शंकर रानडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात ते बोलत होते. वैद्यक क्षेत्रासाठीचा हा पुरस्कार ' डॉक्टर, मला सुंदर दिसायचंय'. या मेनका प्रकाशनाच्या पुस्तकासाठी डॉ. नितीन ढेपे यांना डॉ. मधुसूदन झंवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रू. ५०००/- आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. व्ही. एन. करंदीकर आणि डॉ. मनोज देशपांडे यांच्या निवड समितीने या वर्षीच्या पुरस्कारासाठी या पुस्तकाची निवड केली. सुंदरता ही माणसाची भूक आहे पण सौंदर्याविषयी माध्यमांमध्ये सध्या उथळ प्रचार होतो आहे म्हणून सौन्दर्याची तत्त्वे सामान्यांना कळावीत हा या पुस्तक लेखनाचा हेतू आहे, असे पुरस्काराचे मानकरी डॉ. नितीन ढेबे यांनी सांगितले. समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, सुंदर दिसण्याइतकेच मनाने आणि विचाराने सुंदर असणे महत्त्वाचे आहे. स्वतःबरोबरच इतरांचे जीवन सुंदर करणे हा ध्यास असला पाहिजे, त्यातच जीवनाची सुंदरता आहे. काही वर्षांपूर्वी साहित्यनिर्मिती ही मराठीच्या प्राध्यापकांची मिरासदारी होती, आता विविध क्षेत्रातील लोक लिहू लागल्यामुळे साहित्याचा परीघ विस्तारतो आहे. वैद्यकीय क्षेत्राचे सेवेचे रूप बदलून त्याला आज व्यवसायाचे रूप आले आहे, ही एक प्रकारची कुरुपताच आहे ती दूर करण्यासाठी रुग्नांमधल्या माणसांकडे डॉक्टरांनी संवेदनशीलतेने पहिले पाहिजे. निवड समितीच्या वतीने, डॉ. मनोज देशपांडे यांनी निवडीमागील भूमिका विशद केली. दीपक करंदीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन मसापचे कार्यवाह बंडा जोशी यांनी केले.
