वाङ्मयीन संस्थांचे सामाजिक व्यवहारामध्ये महत्वाचे स्थान आहे : डॉ. सदानंद मोरे

वाङ्मयीन संस्थांचे व्यवहार हे सामाजिक दृष्टया अतिशय महत्वाचे असतात. असे संस्थात्मक काम किती महत्वाचे आहे याची जाणीव कै. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या साहित्य परिषदेतील कार्यकर्तृत्वामधुन दिसून येते. सर्वांना बरोबर घेऊन, माणसांमधले गुण हेरून त्यांनी संस्थेला पुढे नेले. असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद व जोगळेकर परिवाराच्या वतीने दिला जाणारा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि व्यासंगी प्राध्यापक प्रा. डॉ. विलास खोले यांना डॉ. मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रु. दहा हजार, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, डॉ. रेखा इनामदार - साने, उज्ज्वला जोगळेकर, पराग जोगळेकर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना डॉ. विलास खोले म्हणाले, मिळालेल्या पुरस्कारामुळे आपण आपली क्षमता कितीतरी पटीने वाढवली पाहिजे आणि नवेनवीन विचारशाखा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि साहित्याच्या मर्यादित क्षेत्रात देखील इतके वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत, त्या सर्वांचे आकलन करून घेण्यासाठी आपल्या सगळ्या शक्ती एकवटणे आवश्यक आहे. याची या पुरस्कारामुळे जाणीव झाली. पुरासकराचे मानकरी डॉ. विलास खोले यांच्या शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन, संशोधन आणि मार्गदर्शनविषयक कार्याचा आढावा, साहित्याच्या व्यासंगी प्राध्यापक डॉ. रेखा इनामदार - साने यांनी घेतला.
मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, डॉ. जोगळेकर हे साहित्यसंस्थांचा आधारवड होते. निरपेक्ष बुद्दीने आणि निस्पृह वृत्तीने संस्थात्मक कार्य कसे करता येते याचा ते आदर्श वस्तुपाठ होते. संस्थेच्या हितासाठी वाईटपणा विकत घेणारा माणूस अशीच त्यांची ओळख होती. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार डॉ. विलास खोले यांच्यासारख्या व्यासंगी प्राध्यापकाला, वाङमयीन विचारांचा पैस व्यापक असलेल्या, चिकित्सक आणि मर्मग्राही समीक्षा दृष्टी असलेल्या आस्वादक समीक्षकाला दिला जातो आहे, याचा आनंद आहे. या समारंभाला परिषदेचे माजी पदाधिकारी डॉ. सु. रा. चुनेकर, ह. ल. निपुणगे, नाना जोशी, डॉ. कल्याणी दिवेकर साहित्ययिक भारत सासणे उपस्थित होते.
मसापचे कार्यवाह प्रमोद आडकर, माधव राजगुरू, शिरीष चिटणीस, उद्धव कानडे, उपस्थित होते. परिषदेचे कार्यवाह दीपक करंदीकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन कार्यवाह बंडा जोशी यांनी केले.