शौर्य आणि क्रौर्य यात भेदच राहिला नाही 'मसाप गप्पा' कार्यक्रमात विद्या बाळ यांची खंत

पुणे : बलात्काराचा कायदा कठोर झाल्यामुळे गुन्हा सिद्ध झाला तर जबर शिक्षा होईल या भीतीने बलात्काराबरोबरच कौर्याच्या घटना वाढत आहेत. प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करतानाही लाथा बुक्क्या मारल्या जातात, यासारख्या गोष्टीमागे मर्दानगीचा खोटा अहंकार आहे. समाजातली असहिष्णुता वाढते आहे. अहिंसा म्हणजे षंढत्व अशी जी समाजाची मानसिकता झाली आहे, ती बदलणे गरजेचे आहे. शौर्य आणि क्रौर्य यात भेदच राहिला नाही अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात उत्पल व. भा. यांनी विद्या बाळ यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या. बाळ म्हणाल्या, कायद्याची निर्मिती हे स्त्रियांच्या चळवळीचे फलित आहे. बलात्कार, हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार आरक्षण या प्रश्नासाठी स्त्रियांच्या चळवळीने खूप महत्वाचे योगदान दिले. स्त्री - पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी पुरुषांना माणसावळणं गरजेचे आहे. कुटुंबात लोकशाही आल्यास स्त्री पुरुषात समानता येईल. लग्न व्यवस्थेने प्रश्न निर्माण केले आहेत. स्त्रियांच्या चळवळी संपल्या नाहीत त्यात विखुरलेपणा आलाय त्यामुळे एक जुटीचा जो परिणाम असतो तो होताना दिसत नाही. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.