न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रविण दवणे यांची गप्पांची मैफल रंगली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात सहभाग

जगातली सगळीच घड्याळे
फेकून देऊन अरबी समुद्रात,
आम्ही शिरलो पुस्तकांच्या जगात ! रंगीत चित्रांच्या बागेतून, सहज भिजलो कवितेच्या कारंज्यातून
अशा आपल्या कविता खास शैलीत ऐकवत, गोष्टी सांगत प्रसिद्ध कवी प्रविण दवणे यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गप्पांची मैफल रंगवली. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमाचे. त्यात प्रविण दवणे सहभागी होऊन संवाद साधत होते. यावेळी व्यासपीठावर साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमाचे समन्वयक माधव राजगुरू, कार्यवाह दीपक करंदीकर, मुख्याध्यापक नागेश मोने उपस्थित होते. दवणे म्हणाले, आमक्यासारखा हो, तमक्यासारखा होण्याचा प्रयत्न कर, असे मुलांना बजावले जाते, पण मुलांनो तुम्हाला जे व्हावंसं वाटतं तेच व्हा स्पर्धा केवळ जिंकायला किंवा हरायला शिकवत नाही. तर दुसऱ्यांचे जिंकणे साजरे करायला शिकवते. मनातली गरिबी झटकून टाका. मनगटाची श्रीमंती वाढविण्यासाठी पुस्तकांच्या विश्वात रमायला शिका. काठावर बसून नदीत पोहण्याचा आनंद घेता येत नाही. नुसती पुस्तके पाहून त्यातला आनंद समजणार नाही म्हणून पुस्तकांच्या सरोवरात डुंबायला शिका. वाचनामुळे मनाला पंख फुटतात आणि कर्तृत्वाच्या आकाशात अधिक उंच भरारी घेता येते.
प्रा. जोशी म्हणाले, "स्वतःमधल्या कोणत्याही कलागुणांना कमी समजू नका कारण झाडाच्या कोणत्या फांदीला पहिले फळ येईल ते सांगता येत नाही. आयुष्यात केवळ रेसचे घोडे बनू नका. पुस्तकांचे विश्व अद्दभूत आहे. या विश्वात रममाण व्हायला शिका. साहित्यात माणसांचे आयुष्य बदलण्याची ताकत आहे. मनात आलेले विचार स्वतःच्या भाषेत आणि शैलीत लिहा. लिहिताना कुणाचेही अनुकरण करू नका आणि कुणाशी तुलनाही करू नका. लेखनातून आणि वाचनातून साहित्याचा निखळ आनंद मिळवा. सुवर्णा बोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले.
