मसाप शाखाही करणार 'अभिजात'साठी जागर
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची २०१६-१७ या वर्षातील तिसरी सभा आज माधवराव पटवर्धन सभागृहात कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाखांनीही आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचे अभियान राबवावे असा निर्णय घेण्यात आला मसापचे कार्यक्षेत्र असलेल्या पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक, ठाणे, धुळे, जळगाव, नंदुरबार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, या जिल्ह्यात मसापच्या शाखांच्या वतीने तिथल्या शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा' अशी आग्रही मागणी करणारी पत्रे पाठविण्यात येणार आहेत तसेच तिथेही जिल्हावार साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्यांची निवेदने पंतप्रधानांना पाठविण्यात येणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेने नुकतीच अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात साहित्यिकांची एक बैठक घेऊन एक कृती आराखडा तयार केला होता. या बैठकीला चाळीस साहित्यिक उपस्थित होते. साहित्य महामंडळाच्या पुण्याच्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीतही हा विषय उपस्थित केला जाईल, असे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.
मसापच्या सातारा शाखेची कार्यकारिणी बरखास्त
या बैठकीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराच्या तक्रारीत प्रथम दर्शनी तथ्य आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच या तक्रारीनुसार आर्थिक व्यवहाराची सखोल चॊकशी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
मसापची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
महाराष्ट्र साहित्य परिषदेची २०१६-१७ या वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त उल्हासदादा पवार, उपाध्यक्ष निर्मला ठोकळ, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. या सभेत कार्यवृत्त संमत करणे, ताळेबंद आणि उत्पन्न - खर्चपत्रक संमत करणे, अर्थसंकल्प समंत करणे आणि हिशेब तपासणीसांची नेमणूक करणे. याप्रमाणे कामकाज झाले. प्रा. मिलिंद जोशी यांनी नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारल्यानंतर हाती घेतलेल्या नव्या उपक्रमांची आणि भविद्यातील योजनांची माहिती सभेला दिली. अध्यक्षीय समारोप करताना अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रासाठी जसे जनआंदोलन उभे केले गेले तसेच मराठी भाषेसाठी करण्याची गरज आहे. तसेच मराठी साहित्याची चळवळ गतिमान करणे गरजेचे आहे. आपण इंग्रजीचे गुलाम झालो तर पुढच्या पिढया माफ करणार नाहीत. त्यासाठी साहित्य चळवळी अधिक विकसित होणे गरजेचे आहे.