'आपले सांस्कृतिक संचित हा महान ऊर्जास्रोत' : डॉ. सरोजा भाटे राजेंद्र खेर यांना युगंधर सन्मा

पुणे : आपले सांस्कृतिक संचित हा महान ऊर्जास्रोत आहे. तो मागून मिळत नाही. तो अनादी काळापासून वाहत आला आहे. त्याचा वापर काही लेखकांनी समर्थपणे केला आणि त्यातून चिरंतन कलाकृती निर्माण झाल्या. असे मत संस्कृतच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. सरोजा भाटे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि शिवाजी सावंत मित्र मंडळ यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध कादंबरीकार राजेंद्र खेर यांना युगंधर सन्मान डॉ. सरोजा भाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, जयराम देसाई, अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर उपस्थित होते. यावेळी आधुनिक युगातही ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित साहित्यकृतीकडॆ वाचकांचा ओढा जास्त का आहे? या विषयावर डॉ.सरोजा भाटे, राजेंद्र खेर आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. भाटे म्हणाल्या भूतकाळात रमणे आणि अद्भुताची ओढ ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. काल्पनिक कथानकांपेक्षा ही अंतरावरची आणि परिचित कथानके वाचकांना जवळची वाटतात. अमूर्त व्यक्तिरेखा मूर्त झाल्यास वाचकांना जिज्ञासा आणि कुतूहल वाटते. लेखकांनीही ऐतिहासिक आणि पौराणिक विषय समर्थपणे हाताळल्यामुळेही वाचकांचा या साहित्यकृतींना मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे.

खेर म्हणाले मी समाजमन गढूळ करणारे लेखन केले नाही. लेखनांतून तुरटी फिरवण्याचे काम मी केले. जागतिकीकरणापूर्वी समाजमन शांत आणि स्वस्थ होते त्यामुळे माणसे संगीत, साहित्य, कलेत रमत होती. नंतर पत्, पैसा आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे मनःशांती हरवली आहे, त्यामुळे शाश्व्त मूल्यांकडे नेणाऱ्या साहित्याची समाजाला गरज वाटते आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि पौराणिक साहित्यावर आधारित साहित्यकृतींचा खप वाढतो आहे. आज प्राचीन विषय इंग्रजी साहित्यातही खपाचे ठरत आहेत. उत्क्रांती इतकेच अपक्रांतीचे आकर्षण वाढत आहे. त्याभूमिकेतूनही या साहित्याचा वाचकवर्ग वाढतो आहे. शाश्व्त मूल्यांकडे जाण्यासाठी बुध्दिनिष्ठा आणि भावही हवा. प्रा. जोशी म्हणाले रामायणापेक्षाही महाभारतावर आधारित साहित्य कृतींकडे वाचकांचा ओढा अधिक आहे. रामायण जीवन कसे असावे हे सांगते. महाभारत जीवन कसे आहे हे सांगते. काळ कितीही पुढे गेलेला असला तरी जगण्यातले पेच तसेच आहेत. नातेसंबंधातली गुंतागुंतही तशीच आहे. आधुनिक काळाने माणसांच्या बाह्यजीवनाचे रूप बदललेले आहे. पण मानवी भावभावनांची आंतरिक ठेवण तशीच आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक काळातील व्यक्तिरेखांशी तुलना करून सामान्य माणसे स्वतः पुरता दिलासा शोधत असतात त्यामुळेच आधुनिक काळातही ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर आधारित साहित्यकृतीकडे वाचकांचा ओढा अधिक आहे. जिथे संघर्ष, नाट्य आणि उपेक्षा आहे अशा व्यक्तिरेखांविषयी शिवाजीरावांना आकर्षण होते. अशा व्यक्तिरेखांना त्यांनी आपल्या कादंबऱ्यांचे नायक बनविले. सावंतांचा उल्लेख ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीकार म्हणून केला जातो, पण त्यांची लेखणी पुराण, इतिहास आणि वर्तमान अशा तीनही काळांना स्पर्श करणारी होती. प्रकाश पायगुडे, जयराम देसाई यांचेही भाषण झाले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.