मसाप ब्लॉग  

"पुरोगामी महाराष्ट्रात आजही आम्हाला स्थान नाही" - लक्ष्मण गायकवाड 'मसाप गप्पा' मध्ये व्यक्त केली खंत

September 23, 2016

       स्वातंत्र्याला आता जवळपास ७० वर्ष पूर्ण झालीत पण तरीही आमच्या भटक्या विमुक्त जमातीसाठी सरकार शंभर रुपयाचे बजेट टाकू शकत नाही. आमच्या लोकांना गावगाडा नाही. हक्काचे घर, गाव नाही. गुन्हेगारी जमात हीच ओळख आहे.  पण सरकार, समाज आम्हाला सामावून घेण्याचे मोठेपण दाखवत नाही अशी खंत प्रसिद्ध साहित्यिक 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी  व्यक्त केली. 

       महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आयोजित 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात लक्ष्मण  गायकवाड यांनी मराठा आरक्षणापासून ते ब्राम्हण द्वेष आता थांबवायला हवा यासह अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. पत्रकार अरुण खोरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.  

          मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात मी नाही पण ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांना  आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे. सरसकट दिले तर लक्ष्मण गायकवाड विरोधात शरदचंद्र पवार अशीही निवडणूक होईल त्यात आमचा टिकाव कसा लागेल ?  आता कुठे तरी ब्राम्हणद्वेष थांबवायला हवा. किती वर्ष हा वाद सुरु ठेवायचा. जात, पात, विसरून मराठी म्हणून आपण एकत्र यायला पाहिजे तरच मराठी भाषा आणि  मराठी माणूस समृद्ध होईल. स्वातंत्र्यानंतर श्रीमंतांच्या कुत्र्याला अंगावर स्वेटर मिळतो  पण आमच्या लोकांना आजही पुरेसे वस्र, अंथरूण  नाही, पाय पसरवायला हक्काची जागा नाही. धनगर समाज, आदिवासी  आरक्षणासाठी भांडत आहेत. त्यांनी आमच्यात यायला आमचा विरोध नाही पण त्यांनी आम्हालाही सोबत घ्यावे आणि आमच्याही  पदरात काही तरी पडू द्यावे. 

          भटक्या विमुक्तांना न्याय देऊ असे अनेक बड्या पुढाऱ्यानी वेळोवेळी सांगितले पण आमच्या झोळीत आजपर्यंत काहीही पडले नाही. झोळी फार फाटायला आली आहे  पण आम्हाला आशा आहे, उद्यातरी तुम्ही आम्हाला तुमच्यात सामावून घ्याल. सरकार आमच्या विकासासाठी आर्थिक तरतूद करेल.  मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.  कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांनी आभार मानले. यावेळी मसापचे कार्यवाह उद्धव कानडे, माधव राजगुरू, बंडा जोशी, दीपक करंदीकर व अरविंद संगमनेरकर उपस्थित होते. 

 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive
Please reload

Search By Tags