विद्यार्थिनींनी घेतली लेखकाची मुलाखत
नूमविच्या विध्यार्थिनीशी श्रीकांत चौगुले यांनी साधला संवाद

पुणे : नूमवि मुलींच्या शाळेत सातवीच्या मुलींनी आपल्या मनातील प्रश्न विचारत लेखकाचीच मुलाखत घेतली. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचे.
पाठ्यपुस्तकातील लेखक आणि विद्यार्थी यांची भेट व्हावी, त्यांच्यात संवाद व्हावा. मुलांना प्रत्यक्षात लेखकांचा सहवास लाभावा या उद्धेशाने लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. लेखक श्रीकांत चौगुले यांचा सातवीच्या बालभारती पुस्तकात डॉ. नरेंद्र जाधव यांच्या मुलाखतीवर आधारित पाठ आहे. त्याचे औचित्य साधून मुलींनी उस्फूर्तपणे प्रश्न विचारले आणि मुलखातकाराचीच मुलाखत घेतली. या वेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह व या उपक्रमाचे समन्वयक माधव राजगुरू, कार्यवाह दीपक करंदीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी मकलूर उपमुख्याध्यापक शहापूरे, अंजली जोगळेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुलींच्या प्रश्नांना उत्तरे देताना श्रीकांत चौगुले म्हणाले, " प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवनात यशश्वी ठरलेल्या व्यक्तींचा आदर्श हा आपल्या वाटचालीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक ठरतो. अनेक मोठ्या माणसांच्या जडणघडणीत पुस्तकांचे महत्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे शालेय वयापासून आपण पुस्तकांची मैत्री केली पाहिजे. " मैत्री संबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढे ते म्हणाले, " चांगल्या संगतीमुळे आयुष्याला गती मिळते, म्हणून चांगले मित्र मैत्रिणी जोडणे गरजेचे असते."
प्रा. जोशी म्हणाले, " आयुष्यात कोणत्याही कलागुणांना कमी समजू नका, कारण झाडाच्या कोणत्या फांदीला पहिले फळ येईल ते सांगता येत नाही. शब्दामध्ये माणसाचे आयुष्य बदलण्याची ताकद आहे. एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगण्याचा अनुभव केवळ पुस्तके देऊ शकतात. शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्वे अन्नातून मिळतात, पण मन आणि बुद्धीच्या भरण-पोषणासाठी आवश्यक जीवनसत्वे पुस्तकातूनच मिळतात, म्हणून पुस्तकांची मैत्री करा.
कार्यक्रमाचे स्वागत नंदिनी मकलूर यांनी तर प्रास्ताविक माधव राजगुरू यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीच्या विद्यार्थिनी सानिका पास्टे व ईशा भिलारे यांनी केले.
