मसाप ब्लॉग  

मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. प्रज्ञा दया पवार यांची निवड

September 29, 2016

पाटणला होणार संमेलन, डॉ. आंबेडकरांच्या विचारस्मृतीस संमेलन समर्पित 

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पाटण आणि बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मसापचे यंदाचे विभागीय साहित्य संमेलन ८ आणि ९ ऑक्टोबरला पाटण ( जि. सातारा) येथे होणार आहे. हे संमेलन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या विचारस्मृतीस समर्पित करण्यात आले आहे.

      या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. महाराष्ट्राचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी, शोभायात्रा आणि ग्रंथप्रदर्शनांच्या उदघाटनाने होणार आहे. संमेलनाचे उदघाटन मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी परिषदेचे विश्वस्त उल्हासदादा पवार, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष सोपानराव चव्हाण, विभागीय संमेलनाचे निमंत्रक पद्माकर कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, विभागीय कार्यवाह विनोद कुलकर्णी आणि प्राचार्य तानसेन जगताप, सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. 

    उदघाटनानंतरच्या  सत्रात 'आंबेडकरी विचार आणि आजचे वास्तव' हा परिसंवाद ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात डॉ. यशवंत पाटणे, डॉ. सुलक्षणा कुलकर्णी, डॉ. भारती पाटील आणि डॉ. रघुनाथ केंगार हे वक्ते सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध कवी विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून त्यात महाराष्ट्रातील अनेक नामवंत आणि नवोदित कवी सहभागी होणार आहेत. रात्री आंबेडकरी जलसा सादर करण्यात येणार असून डॉ. आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारित ध्वनिचित्रफित दाखविली जाणार आहे. 

     ९ ऑक्टोबर रोजी पहिल्या सत्राची सुरुवात कथाकथनाने होणार असून त्यात बाबा परीट, जयवंत आवटे आणि रवींद्र कोकरे हे कथाकार सहभागी होणार आहेत. दुसऱ्या सत्रात डॉ. रावसाहेब कसबे यांची प्रकट मुलाखत लेखक किशोर बेडकिहाळ घेणार आहेत. तिसऱ्या सत्रात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लेखकांची उदासिनता हा परिसंवाद ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात प्रा. सयाजीराव मोकाशी, संभाजीराव मोहिते, राजा शिरगुप्पे, रवींद्र येवले सहभागी होणार आहेत. संमेलनाचा समारोप मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम आणि विश्वस्त यशवंतराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

संमेलनाची खास वैशिष्टये :- 

:-  संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या  जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या विचारस्मृतीस समर्पित. 

:- संमेलनाचा प्रारंभ भीमवंदनेने होणार 

:- संमेलनाचे उदघाटन दीपप्रज्वलनाऐवजी   परिवर्तन मशाल प्रज्वलित करून होणार

:- संमेलनात सादर होणार आंबेडकरी जलसा.  

:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारित ध्वनिचित्रफित दाखविणार.  

:- संमेलनात शाल आणि पुष्पगुच्छाऐवजी डॉ. आंबेडकरांची ग्रंथसंपदा देऊन होणार मान्यवरांचे स्वागत. 

:- शोभायात्रा आणि ग्रंथदिंडीत असणार विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयीन युवकांचा लक्षणीय सहभाग.  

:- संमेलन स्थळाजवळ असणार ग्रंथप्रदर्शन.  

:- दोन परिसंवाद, कथाकथन कविसंमेलन, मुलाखत असे भरगच्च कार्यक्रम.    

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive