top of page

मसाप ब्लॉग  

प्रत्येक गावचा इतिहास 'गॅझेटिअर' व्हावा : डॉ. सदाशिव शिवदे

मसाप मध्ये डॉ. आनंद दामले यांना कै. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुरस्कार प्रदान


पुणे : आज अनेक गावचा इतिहास लिहिणे गरजेचे आहे. कारण गावातील अनेक गोष्टी लुप्त होत आहेत. सणउत्सव दिसत नाहीत. माणसे एकमेकांपासून दुरावत आहेत. पूर्वजांचा इतिहास आपण लिहिला तर आजसुद्धा हा जिव्हाळा, प्रेम आनंद निर्माण करता येईल. प्रत्येक गावचा इतिहास 'गॅझेटिअर' होणे गरजेचे आहे. हे लेखन तेथील ग्रामपंचायतीने प्रसिद्ध करावे. असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वतीने, देण्यात येणारा कै. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुरस्कार यावर्षी प्रा. डॉ. आनंद दामले (कोल्हापूर) लिखित कसबा बीड - एक ऐतिहासिक नगर या ग्रंथाला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, परीक्षक महेश तेंडुलकर उपस्थित होते. यावर्षी पुरस्कारासाठी महेश तेंडुलकर आणि डॉ. भूषण फडतरे यांनी परीक्षक म्हणून काम केले.

शिवदे म्हणाले, " १२ व्या शतकात काश्मीरच्या राजाच्या एका सरदाराचा मुलगा 'कल्हण' याने काश्मीरचा इतिहास 'राजतरंगिणी' या नावाने लिहिला, त्या पूर्वीपासून तेथे इतिहास लेखनाची परंपरा आहे. रागद्वेष टाळून इतिहास लिहायला हवा, आज तसे होते का? राजवाड्यांनी सुद्धा कोणतेही शास्त्र किंवा इतिहास लेखन करताना त्यासाठी मायेचे, जिव्हाळ्याचे होमरूल यावयास हवे असे म्हटले आहे. आज इतिहास किंवा कलाशाखेकडे मुले जात नाहीत. इंगलंडमधेपण अशी वेळ आली होती. डॉ. आनंद दामल्यांसारख्या विद्वानांनी केलेले संशोधन आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल. कसबा - बीड या गावी तरुण जातील आणि अधिक संशोधन करतील, आणि इतिहास संशोधनाची ज्योत अशीच तेवत राहील.

पुरस्काराचे मानकरी प्रा. डॉ. आनंद दामले म्हणाले, "कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बीड या गावामध्ये १०० ते १५० वीरगळ (वीरांच्या स्मृतिशिळा) आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या हे गाव खूप महत्वाचे आहे. हे लक्षात आल्यानंतर या गावाचा ऐतिहासिक मागोवा घ्यावा असे वाटले आणि हे पुस्तक सिद्ध झाले".

प्रा. जोशी म्हणाले, " दत्तो वामन पोतदार हे चालता बोलता ज्ञानकोश होते. सात दशके महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर त्यांचा विलक्षण प्रभाव होता. त्यांना ज्ञानाचे कोणतेही क्षेत्र वर्ज्य नव्हते. एकीकडे अखंड ज्ञानसाधना करताना त्यांनी दुसरीकडे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक संस्थांमधील कार्यकर्तेपणही तितक्याच दिमाखात कसोशीने पार पाडले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेत पोतदारानी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी साहित्य परिषदेच्या इतिहासाबरोबरच संमेलनाचाही इतिहास लिहिला. परीक्षक महेश तेंडुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. कार्यवाह बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page