'बहुरूपी पु. ल. ' मधून उलगडणार पुलंची कलाक्षेत्रातील मुशाफिरी
८ नोव्हेंबरला मसापतर्फे विशेष कार्यक्रम, 'व्यक्तिवेध' या उपक्रमाचा शुभारंभ आणि लघुपटही दाखविणार
पुणे : कलेचे विविध प्रांत आपल्या प्रतिभेने समृद्ध करणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, आशय सांस्कृतिक आणि अक्षरधारा यांच्या संयुक्त विद्यमाने 'बहुरूपी पु. ल.' या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पुलंच्या बहुमाध्यमी संचाराचा मागोवा घेणाऱ्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यात ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे, साहित्य परिषदेचे कार्यध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि डॉ. आशुतोष जावडेकर सहभागी होणार आहेत या चर्चासत्रा नंतर पुलंच्या षष्ट्यब्दीनिमित्त फिल्म डिव्हिजनने तयार केलेला आणि स्वतः पुलंनी आत्मकथन केलेला 'पु. ल.' हा लघुपट (कालावधी ६० मिनिटे) दाखविण्यात येणार आहे हा कार्यक्रम मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिर टिळक रोड येथे होणार आहे अशी माहिती मसापचे कार्यध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रा. जोशी म्हणाले, थोर सारस्वतांच्या जीवन आणि साहित्याचा वेध घेणारा व्यक्तिवेध हा नवा उपक्रम साहित्य परिषदेने आशय संस्कृतिकच्या सहकार्याने सुरु करण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमांत साहित्यिकांवरील दुर्मिळ लघुपट पाहण्याची संधी साहित्यरसिकांना मिळणार आहे. तसेच त्या साहित्यकांचा जीवन आणि साहित्यप्रवास उलगडून दाखविणारे एका अभ्यासकाचे व्याख्यानही रसिकांना ऐकता येणार आहे. पुलंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित 'बहुरूपी पु. ल.' या कार्यक्रमापासून या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.