'मसाप' चा शाखा मेळावा १३ नोव्हेंबरला होणार चाळीसगावला
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचा यावर्षीचा शाखा मेळावा चाळीसगाव (जि. जळगाव) येथे शनिवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या शाखा मेळाव्याचे उदघाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. या शाखा मेळाव्याला मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, विभागीय साहित्य संमेलनाचे निमंत्रक पद्माकर कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, विभागीय कार्यवाह विनोद कुलकर्णी आणि प्राचार्य तानसेन जगताप यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य आणि शाखा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले " मसापच्या शाखा या मसापच्या रक्तवाहिन्या आहेत त्या प्रवाहीत राहणे आवश्यक आहे. आज शाखांसमोर अनेक अडचणी आणि आव्हाने आहेत. त्या दूर व्हाव्यात, शाखांचे कामकाज सुरळीत व्हावे या उद्देशाने शाखा मेळाव्याचे आयोजन केले आहे. अनेकदा कार्यक्रम नसल्यामुळे शाखांचे कामकाज मंदावते त्यातून मार्ग काढण्यासाठी मसापने कार्यक्रमांचे विकेंद्रीकरण करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असून त्याला शाखांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शाखांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी या शाखामेळाव्यात चिंतन होणार आहे. शाखांचे प्रगतीपुस्तक तयार करण्याचाही मानस आहे. मसापच्या प्रत्येक शाखेचे दोन प्रतिनिधी या शाखामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत".
'मसाप ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करणार'
पुण्यासारख्या महानगरात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची खूप रेलचेल असते त्यामुळे तेथील साहित्य रसिकांना कार्यक्रमांचा आस्वाद घेता येतो. ग्रामीण भागातील लोकांची वाङमयीन भूक भागविण्यासाठी मसापने विभागीय साहित्य संमेलन, शाखा मेळावा, युवा-साहित्य नाट्य संमेलन आणि समीक्षा संमेलन यासारखे वाङमयीन उपक्रम ग्रामीण आणि दुर्गम भागात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.