'मसाप साजरा करणार माधवराव पटवर्धन सभागृहाचा अमृतमहोत्सव'
२९ नोव्हेंबरला विशेष कार्यक्रम ; साहित्यप्रेमींच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन


महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या आणि शतकोत्तर दशकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वैभव म्हणजे परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह. अनेक दिग्गजांच्या भाषणांचे, संमेलनाध्यक्षांच्या विचारांचे, नामवंत कवींच्या काव्यवाचनाचे, पुस्तक प्रकाशन सोहळयाचे आणि वाङ्मयीन वाद-चर्चेचे साक्षीदार असलेल्या माधवराव पटवर्धन सभागृहाची कोनशिला २९ नोव्हेंबर १९४१ रोजी साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या हस्ते बसविण्यात आली. त्याला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मसापतर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता पटवर्धन सभागृहात होणाऱ्या विशेष समारंभासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, मसापचे पूर्वाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी, प्रा. द. मा. मिरासदार आणि डॉ. प्र. चिं. शेजवलकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले "मसापच्या वास्तूतील माधवराव पटवर्धन सभागृह हे विचारपीठ आहे. या विचारपीठावरून विचार व्यक्त करण्यात साहित्यिकांना नेहमीच धन्यता वाटत आली आहे. सभागृहाला असलेली ग्यालरी, सभागृहाच्या दर्शनी भागात लावलेले आणि नी. म. केळकर यांनी रेखाटलेले माधवराव पटवर्धन यांचे तैलचित्र आणि आजवरच्या सर्व संमेलन अध्यक्षांच्या समान आकारातल्या छायाचित्रांमुळे या सभागृहाला एकप्रकारे साहित्यमंदिराचेच रूप प्राप्त झाले आहे. समृद्ध परंपरा असलेल्या या विचारपीठाचा अमृत महोत्सव परिषदेने वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे".
सायंकाळी रंगणार साहित्यप्रेमींचा स्नेहमेळावा
या निमित्ताने मसापच्या वतीने मंगळवार २९ नोव्हेंबर रोजी सायं. ६ ते ९ या वेळेत साहित्यप्रेमींच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्यने या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी केले आहे.
माधवराव पटवर्धन सभागृहाचा इतिहास

मसापच्या कार्यकारी मंडळाचे सभासद, पत्रिकेचे संपादक आणि १९३६ साली जळगावला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशा त्रिविध नात्यानी प्रसिद्ध कवी माधव जूलियन तथा माधवराव पटवर्धन परिषदेशी संबंधित होते. त्यांचे २९ नोव्हेंबर १९३९ रोजी पुण्यात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सारा महाराष्ट्र हळहळला. मसापने त्यांचे यथोचित स्मारक करण्याची योजना आखून निधीगोळा करण्यास प्रारंभ केला. साहित्यिक वि. द. घाटे आणि ख्रिस्तवासी रावसाहेब रघुवेल लुकस जोशी या दोघांच्या विशेष प्रयत्नामुळे संकल्पित निधी जमला. फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी या सभागृहासाठी ३५०० रुपयांची देणगी दिली. २९ नोव्हेंबर १९४१ रोजी माधवराव पटवर्धन सभागृहाची कोनशिला साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या हस्ते बसविण्यात आली. नव्या कार्यकारिणीने या सभागृहाचे नूतनीकरण करून तेथे मसापचे जन्मस्थळ असलेल्या मळेकर वाड्याची आणि संस्थापकांच्या प्रतिमा लावून त्यांच्या स्मृती जागवल्या आहेत.