आठवणी आणि गप्पांमध्ये रंगला मसापचा स्नेहमेळावा
रोषणाई, रांगोळ्यांची आकर्षक सजावट, दुग्धपानाचा आस्वाद घेता घेता सुरु असलेले हास्यविनोद गप्पा, गोष्टी, चर्चा एकमेकांची मिश्कीलपणे सुरु असलेली चेष्टा मस्करी आणि वास्तूबद्दलच्या आठवणींना दिलेला उजाळा अशा भारावलेल्या वातावरणात साहित्यप्रेमींचा मेळावा मंगळवारी रंगला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने माधवराव पटवर्धन सभागृहाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्यिक व साहित्यप्रेमींचा हा स्नेहमेळावा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. मसापची वास्तू काहीशी वेगळीच भासत होती. साहित्य संस्कृतीच्या संचिताने पावन झालेले माधवराव पटवर्धन सभागृह दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघाले होते. ना कोणते व्याख्यान ना सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. तरीही साहित्यिक आणि साहित्यप्रेमींच्या गजबजाटातून आसमंतात एक नवं चैतन्य निर्माण झाले होते. वास्तूच्या आठवणींच्या सुगंधातून मसापचा संपूर्ण परिसर दरवळून निघाला. कवी हिमांशु कुलकर्णी, डॉ. मंदा खांडगे, दीपक शिकारपूर, संतोष चोरडिया, मधुसूदन घाणेकर, ह. ल. निपुणगे, डॉ. स्वाती कर्वे, जयराम देसाई, चंद्रकांत शेवाळे, ल. म. कडू, डॉ. नीलिमा गुंडी, जयदीप कडू, डॉ. न. म. जोशी, रमण रणदिवे, लक्ष्मीकांत देशमुख, प्रकाश भोंडे, विनया देसाई, रवी मुकुल, अनिल कुलकर्णी, डॉ. अश्विनी धोंगडे, श्याम भुर्के, वर्षा गजेंद्रगडकर, भारती पांडे, राजा फडणीस, डॉ. मेधा सिधये, नावडकर बंधू, मीरा शिंदे, हर्षा शहा, प्रताप परदेशी, सुभाष किवडे, रवींद्र गुर्जर, श्याम जोशी, क्षितीज पाटुकले, रुपाली अवचरे, वैशाली मोहिते असे साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यजमान पदाच्या भुमिकेतून आवर्जून सर्वांचे अगत्य करत होते.
