नाण्यांचा इतिहास ऐकताना दंगून गेली मुले
मसापच्या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात घाणेकरांनी साधला संवाद
'लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील मुला-मुलींनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा........ सूत्रसंचालनापासून ते पाहुण्यांचा परिचय करून देण्यापर्यंतची कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी विध्यार्थ्यानी पार पाडताना तयार झालेला माहोल......... आणि प्रसिद्ध लेखक प्र. के. घाणेकर यांनी मुलांशी गप्पागोष्टीतून साधलेला संवाद........ प्रत्यक्ष दाखवलेली जुनी नाणी व त्यांचा उलगडलेला इतिहास अशा वातावरणात विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये 'लेखक तुमच्या भेटीला' हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमाचे. यावेळी 'मसाप' चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपक्रमाचे समन्वयक माधव राजगुरू, मुख्याध्यापिका अनिता काजरेकर व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
घाणेकर म्हणाले, नाणी हा इतिहासाचा आरसा असतो. जुन्या राजवटीचे त्यातून पुरावे मिळतात. नाण्याला केवळ दोनच बाजू असतात असा आपला समज आहे; पण नाण्याला तीन बाजू असतात. नाणी इतिहासाच्या अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी उपयुक्त ठरतात, अशी माहिती देत नाण्यांच्या संदर्भातील अनेक रंजक गोष्टी त्यांनी मुलांसमोर उलगडल्या.

मुलांनीही अनेक प्रश्न विचारले, सोन्या चांदीची नाणी असतात मात्र हिऱ्यांचं नाणं का नसतं ? एकाचवेळी नाणं आणि तेवढ्याच किमतीची नोट का असते ? नानी गोलच का असतात? नोटा रद्द केल्या जातात तशी नाणी रद्द केल्याचा इतिहास आहे का? या प्रश्नांना घाणेकरांनी समर्पक उत्तरे दिली.
या प्रसंगी प्रा. जोशी म्हणाले, "जिज्ञासा, कुतूहल, औत्युक्य आणि उत्तम निरीक्षण शक्ती या गोष्टी लेखक होण्यासाठी आवश्यक आहेत. भोवतालाकडे डोळसपणे पहा, उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक व्हा. मनातले विचार आपल्या भाषेत आणि शैलीत लिहून काढा, स्वतःला जे वाटते ते व्यक्त करा. बोलत आणि लिहीत राहा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव राजगुरू यांनी केले. सूत्रसंचालन आठवणीतील विद्यार्थिनीनी प्रतिमा पलांडे, परिचय शिवानी ठोंबरे आणि आभार वैष्णवी पुरोहित यांनी मानले.