"सर्जनशीलतेपुढे कथा अनेक आव्हाने उभी करते"
मसापच्या 'कथासुगंध' कार्यक्रमात मोनिका गजेंद्रगडकर यांचे मत

पुणे : अनेक प्रकारचे चकवे दिसत असलेला आणि हाती आल्या सारखा वाटणारा अनुभव एकांगी कधीच नसतो. त्याला अनेक बाजू, मिती आणि कोन असतात. त्यांचे स्तर शोधण्यासाठी कथाकाराला त्याच्यातली संवेदनशक्ती पणाला लावावी लागते. स्वतःमधल्या माणूसपणाचा आणि लेखकत्वाचा अखंड संघर्ष कथाकाराच्या मनात सुरु असतो. कथाकाराच्या सर्जनशीलतेपुढे कथा अनेक आव्हाने उभी करते असे मत मौजच्या संपादक आणि प्रसिद्ध कथाकार मोनिका गजेंद्रगडकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 'कथासुगंध' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. मोनिका गजेंद्रगडकर यांच्या 'शिल्प' या कथासंग्रहातील 'धर्म' या दीर्घ कथेचे अभिवाचन शुभांगी दामले आणि अमृता पटवर्धन यांनी केले.

गजेंद्रगडकर म्हणाल्या, 'कथेचे निवेदन प्रथमपुरुषी की तृतीयपुरुषी या प्रश्नापासून ते आरंभ,मध्य,शेवट असा कथेचा प्रवास विचारात घेताना प्रत्येक पातळीवर कथाकारापुढे पेच निर्माण होत असतात. पात्रांची मनोवस्था शोधताना आपल्यातल्याच माणूसपणाचा कथाकार नकळत शोध घेत असतो हा शोध अलिप्तपणे घ्यावा लागतो आणि पूर्णपणे गुंतूनही घ्यावा लागतो. म्हणूंनच कुठलही सर्जनशील लेखन ही लेखकाला प्रगल्भ आणि अंतर्मुख करीत नेणारी प्रक्रिया असते. कथाकार व्यक्तिरेखांतून त्यांच्या आयुष्यातून, भावनिक - वैचारिक स्पंदनातून एकूण मानवी जीवनाचे, अस्तित्वाचे चिंतन कथेतून मांडत असतो. स्त्रीवाद, सामाजिकता, सामाजिक वास्तव, अशा वादांच्या (ईझम)भूमिकांच्या चौकटीत लेखकाला अनेकदा बसवले जाते. पण कोणताही लेखक विशिष्ट भूमिका घेऊन लिहीत नसतो. कथेतला अनुभव त्याच्यादृष्टीने सर्वात महत्वाचा असतो. लेखकाची विशिष्ट अनुभवाकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी असू शकते पण ती दृष्टी म्हणजे त्याची भूमिका नसते.'
प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.