व्यवस्थेवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार देशद्रोही कसे ? ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचा सवा

देशाची व्यवस्था बिघडवणारे ते देशभक्त आणि त्या बिघडलेल्या व्यवस्थेवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार मात्र देशद्रोही कसे? असा सवाल ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजन'कार' का. र. मित्र व्याख्यानमालेत ते बोलत होते 'व्यंगचित्रे आणि विनोद' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते.
मंगेश तेंडुलकर म्हणाले, " इतर सर्व कला उस्फूर्त आहेत. व्यंगचित्र मात्र प्रतिक्रियेतून जन्माला येते. लेखकाला टोपणनाव घेऊन लेखनाच्या मागे लपता येते तसे व्यंगचित्रकाराला त्याच्या व्यंगचित्रामागे लपता येत नाही. व्यंगचित्र हीच त्याची ओळख

बनते. व्यंगचित्रे आणि त्यातील आशय समजण्याएवढी प्रगल्भता सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या समाजाकडे आजही नाही, त्यामुळेच व्यंगचित्रांमुळे वादळे निर्माण होतात. कधी सरकारची, कधी धर्माची तर कधी जातीची बंधने व्यंगचित्रकारावर येत आहेत, ही चिंतेची बाब आहे. कलाकाराला कोणत्याही कप्प्यात बंदिस्त करणे योग्य नाही. व्यंगचित्र ही अस्थिर कला आहे. कधी ती निरुपद्रवी वाटते. कधी ती काव्यात्म आशय व्यक्त करते. कधी सार्वजनिक सत्य सांगते तर कधी तत्वविचार मांडते तर कधी ती सुरुंगाच्या स्फोटकासारखी रौद्र रूपही धारण करते. विध्वंस हा कोणत्याही कलेचा उद्देश नसतो. तसा तो व्यंगचित्राचाही नाही. विनोद आपल्या आसपास घोटाळत असतो. तो शोधण्याची दृष्टी व्यंगचित्रकाराकडे हवी. व्यंगचित्रकार सामान्य माणसाच्या मनातले भाव व्यक्त करीत असतो".
प्रा. जोशी म्हणाले, " सूक्ष्म निरीक्षण शक्ती बरोबरच तरल संवेदनशीलता आणि विनोदबुद्धी व्यंगचित्रकाराकडे असावी लागते. चित्रकाराबरोबरच विनोदकराचे कसबही व्यंगचित्रकारांकडे असावे लागते. जीवनातील विकृती आणि विसंगतीकडे दयाबूद्धीने पाहण्याची दृष्टी असावी लागते. रंजना बरोबरच डोळ्यात अंजन घालण्याचे काम व्यंगचित्रकार करीत असतात". दीपक करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.