विनोदकाराने अश्रद्धच असले पाहिजे
मुकुंद टाकसाळे 'मसाप' गप्पात उलगडला लेखनप्रवास

पुणे "साक्षात देव भेटला तरी विनोदकाराने त्याच्यावर श्रद्धा ठेवता कामा नये. एकदा श्रद्धास्थाने निर्माण झाली की विनोद निर्मितीला मर्यादा येतात. विनोदकाराने कायम अश्रद्धच असले पाहिजे". असे मत प्रसिद्ध विनोद लेखक मुकुंद टाकसाळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात सुश्रुत कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या अनेक आठवणी आणि किस्से त्यांनी ऐकविले टाकसाळे यांच्या मुलाखतीतून त्यांचा लेखनप्रवास उलगडला.
टाकसाळे म्हणाले," विनोदी सदर लेखन करणे हे लेखकासाठी आव्हानात्मक असते. आपल्याला काहीतरी ठणकावून सांगायचे आहे, असा आत्मविश्वावास ज्यांच्याकडे आहे त्यांनीच सदरलेखन करावे. विनोदी सदरलेखन करताना एखाद्याच्या खासगी आयुष्यातील माहितीचा उपयोग करणे योग्य नाही. हे पथ्य मी नेहमीच पाळले. मान्यवरांच्या सार्वजनिक आयुष्यावर त्यांच्या वक्तव्यावर, त्यांनी घेतलेल्या भूमिकांवर त्यातल्या विसंगतीवर भाष्य करून मी त्यांची खिल्ली उडवली. अशा प्रकारच्या सदरलेखनासाठी लेखकाकडे निर्भयता असणे गरजेचे आहे. वक्तृत्व ही अवसानघातकी कला असल्यामुळे तिच्या अजिबात नादी लागलो नाही. एखादा विनोदी प्रसंग लेखकापुढे साक्षात कथा घेऊन उभा असतो. त्यातल्या निर्मितीच्या क्षमता लेखकाला ओळखता आल्या पाहिजेत. मला विनोद बुद्धीचा वारसा माझ्या वडिलांकडून मिळाला. पु. लं. देशपांडे, जयवंत दळवी आणि अनिल अवचट या लेखकांचा माझ्या लेखनावर प्रभाव आहे." प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले, कार्यवाह दीपक करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.