'मसाप' तर्फे मराठी भाषकांसाठी सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका तयार
१० जानेवारीला डॉ. प्र. ना. परांजपे यांच्या हस्ते प्रकाशन

विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका प्रकाशित केली आहे. मसापचे परीक्षा विभागाचे कार्यवाह व मराठी भाषेचे अभ्यासक माधव राजगुरू यांनी ती तयार केली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवार दि. १० जानेवारी २०१७ रोजी ज्येष्ठ भाषाअभ्यासक डॉ. प्र. ना. परांजपे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समारंभाला मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. मसाप आणि महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जानेवारीला मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी 'शुद्धलेखन' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
भाषेचा वापर करणार्यांना भाषा व्यवहाराचे अनौपचारिक आणि औपचारिक शिक्षण घर परिसर आणि शाळेतून मिळत असते. असे असले तरी शब्दांची उत्पत्ती, शब्दांचे अर्थ, शब्दांचा योग्य वापर आणि लेखनासंबंधीचे नियम माहीत नसल्यामुळे सामान्य भाषिक चुका होतात, त्यामुळे लेखन व्यवहार अशुद्ध होऊ नये यासाठी लेखन विषयक नियम माहीत असणे गरजेचे आहे. त्यासाठी मसापने ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. ती अल्प किमतीत सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ही पुस्तिका निश्चितच उपयुक्त ठरेल. या पुस्तिकेत शुद्धलेखन म्हणजे काय ? या विषयी विवेचन केले असून, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेले अठरा लेखनविषयक नियमही यात समाविष्ट करण्यात आले आहेत. एक अक्षरी, दोन अक्षरी, तीन अक्षरी, शब्दांचे लेखन, जोडाक्षरे, विसर्ग व रेफयुक्त शब्द, अनुस्वारयुक्त इकार-उकार, सामासिक शब्दातील इकार-उकार, विसर्गयुक्त शब्दांचे आणि विशेष नामांचे लेखन, भिन्नअर्थ दर्शवणारे शब्द, जोडाक्षर लेखनाच्या पद्धती, शेवटी ष्ट ष्ठ न ण येणारे शब्द, 'वून' 'ऊन' चा वापर याविषयी उपयुक्त माहिती या पुस्तिकेत आहे. या पुस्तकाच्या लेखनासाठी ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे मार्गदर्शन लाभले असून, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे, अशी माहिती या पुस्तिकेचे लेखक आणि मसापचे कार्यवाह माधव राजगुरू यांनी दिली.