पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन पाच जानेवारीला अध्यक्षपदी डॉ. रामचंद्र देखणे मसाप आणि स. प. महाविद्या

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जानेवारीला पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. देखणे लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि पर्यावरण या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. हे संमेलन स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सकाळी ११ ते ५ या वेळेत होणार आहे अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ उपस्थित होते. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांच्या हस्ते करण्यात आले.

या संमेलनाचे उदघाट्न ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे यांच्या हस्ते होणार असून उदघाट्न सत्रानंतर त्यांची प्रकट मुलाखत डॉ. मंदार परांजपे घेणार आहेत. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या साहित्याचे सादरीकरण या संमेलनात होणार आहे. दुसऱ्या सत्रात पर्यावरणतज्ज्ञ अनिरुद्ध चावजी यांचे 'रामायणातील पक्षीजीवन' या विषयावर व्याख्यान होणार आहे. अशोक नायगावकर आणि रमजान मुल्ला यांच्या कवितांची मैफिलही या संमेलनात रंगणार आहे. संमेलनाचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या संमेलनासाठी प्रवेश विनामूल्य असून इच्छुकांनी ७३८५०२९८२५ या क्रमांकावर एसएमएसद्वारे अथवा (masaparishad@gmail.com) या पत्यावर इ-मेलद्वारे (नाव पत्यासह) आपली नावनोंदणी करावी असे आवाहन मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले . नावनोंदणी करून संमेलनाला उपस्थित राहणाऱ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अशी माहिती वीरेंद्र चित्राव यांनी दिली. विद्यार्थी मांडणार पर्यावरण रक्षणाचे ठराव
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे ठराव मांडणार आहेत. स्वतःच्या जीवन शैलीपासून ते महाविद्यालयाच्या परिसरातील पर्यावरणाबरोबरच भोवतालच्या पर्यावरणाच्या रक्षणाविषयीचे हे ठराव सूचक - अनुमोदकासह मंजूर करण्यात येणार आहेत.