मसाप ब्लॉग  

मसापच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर, २० जानेवारीला पुरस्कार वितरण

अंतर्नाद, झपूर्झा, साप्ताहिक सकाळ, चतुरंग अन्वय, किशोर आणि डिजीटल (ऑनलाईन) या दिवाळी अंकांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पारितोषिक

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा (२०१६) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' अंतर्नाद या दिवाळी अंकाला, 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 'झपूर्झा' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'साप्ताहिक सकाळ' या दिवाळी अंकाला, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'चतुरंग अन्वय' या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर डेलीहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'डिजीटल' या दिवाळी अंकाला देण्यात येणार आहे. 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाङ्मयाचे पारितोषिक' 'किशोर' या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' उद्याचा मराठवाडा' या अंकातील लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'बाटगी विहीर' या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'पुणेपोस्ट' या दिवाळी अंकातील वसंत आबाजी डहाके यांच्या 'अर्धनारीश्वर' या लेखाला जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती या स्पर्धेचे निमंत्रक आणि ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी दिली. या स्पर्धेसाठी यावर्षी महाराष्ट्रातून १३० दिवाळी अंक आले होते. त्यातून वरील दिवाळी अंकाची पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय सोलंकर आणि अनिल गुंजाळ यांनी काम पाहिले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार २० जानेवारी २०१७ सायंकाळी ६.३० वा. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून दै. लोकमतचे संपादक विजय बाविस्कर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.


दिवाळी अंकाना १०७ वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. दिवाळी अंक आणि मराठी माणूस यांचे अतूट नाते आहे. मराठी भाषेची ही वैभवशाली परंपरा जोपासण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली १९ वर्ष दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांना उत्तेजन मिळावे, नव्या दमाच्या आणि ताकदीने लेखन करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.


Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon