मूल्यगर्भ निर्मितीसाठी साहित्यसाधना आवश्यक भानू काळे यांचे 'मसाप गप्पा' मध्ये मत

काळाने उभ्या केलेल्या प्रश्नाला भिडण्याचे साहित्य हे प्रभावी माध्यम आहे. वाङमयीन संस्कृतीची जोपासना कसदार लेखनातूनच होत असते, मात्र मराठीतील लेखक सन्मान, पुरस्कार, परीक्षणे, समित्या आणि स्वतः साठीची मोर्चे बांधणी यातच गुंतल्यामुळे कसदार लेखनाचा स्रोत आटत चालला आहे असे मत अंतर्नाद मासिकाचे संपादक आणि साहित्यिक भानू काळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 'मसाप गप्पा' या कार्यक्रमात लेखक व पत्रकार सदा डुंबरे यांनी काळे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते या मुलाखतीतून भानू काळे यांचा वाड्मयप्रवास उलगडला.
काळे म्हणाले, आजचा समाज वैचारिकतेपासून दूर चालला आहे. एकेकाळी समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांना आपण मराठीत साहित्यनिर्मिती करून नाव कमवावेअसे वाटत होते. ती आकांक्षा आज राहिली नाही. जीवनाचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. माध्यमांपासून समाजापर्यंत सर्वत्र साहित्याला दुय्यम स्थान आज मिळते आहे. साहित्याचे सामाजजीवनातील महत्व कमी होत चालले आहे. जागतिकीकरणाचा मी समर्थक आहे पण त्या निमित्ताने घडत असलेल्या अनुषंगिक गोष्टी मात्र स्वीकारण्यास योग्य नाहीत. मराठी भाषेच्या उत्कर्षाच्या आड मराठी माणसांची उदासीनताच येत आहे. ज्यांच्या कडून भाषेच्या उत्कर्षांच्या अपेक्षा ठेवायच्या त्यांचाच बुद्धिभ्रम झालेला आहे. मराठी नियतकालिकांचे भवितव्य हा चिंतेचा विषय आहे. साहित्य व्यवहारात लेखक आणि प्रकाशकांइतकेच वाचकांचे स्थान महत्वाचे आहे याचे भान मराठी साहित्यविश्वाने ठेवले पाहिजे.