संपादनासाठीही रियाज आवश्यक असतो इंदुमती जोंधळे यांचे मत : मसापतर्फे दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषि

जुन्यांचा मान आणि नव्यांचा सन्मान हे सूत्र पूर्वीपासून संपादकांनी जोपासले आहे. विषयाचे नियोजन, लेखकांची निवड यासाठी संपादकांकडे विधायक दृष्टी, सखोल वाचन असावे लागते. संपादनासाठीही रियाज आवश्यक असतो. मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी लेखकांप्रमाणे वाचकांचीही आहे. आपली मुले, नातवंडे मराठी वाचतात का, याचा शोध स्वतःच्या घरापासून सुरु करायला हवा. मराठी समृद्ध असल्यामुळे लोप पावणारच नाही; मात्र भाषेचा अधिकाधिक विस्तार झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी व्यक्त केले. मसापच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या, यावेळी व्यासपीठावर दैनिक लोकमतचे संपादक विजय बावीस्कर, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्योत्स्ना चांदगुडे, अनिल गुंजाळ आणि धनंजय सोलंकर यांनी काम पहिले. यावेळी या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' अंतर्नाद या दिवाळी अंकाला, 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 'झपूर्झा' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'सकाळ साप्ताहिक' या दिवाळी अंकाला, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'चतुरंग अन्वय' या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर डेलीहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'डिजीटल' या दिवाळी अंकाला देण्यात आले तसेच 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाङ्मयाचे पारितोषिक' 'किशोर' या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' उद्याचा मराठवाडा' या अंकातील लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'बाटगी विहीर' या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'पुणेपोस्ट' या दिवाळी अंकातील वसंत आबाजी डहाके यांच्या 'अर्धनारीश्वर' या लेखाला जोंधळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .
डहाके म्हणाले, " पेरुमल मुरूगनची कादंबरी ही दोन जीवांच्या उत्कट प्रेमाचे दर्शन घडविते. तरीही मुरूगनला प्रचंड त्रास सहन करावा लागला. न्यायालयाच्या निर्णयामुळे मुरूगनला न्याय मिळाला; मात्र समाजाच्या विपरीत वाचनामुळे असे घडत आहे. तामिळनाडूमधील मुरूगनसारखा लेखक स्वतःला मारून टाकण्याचे बोलतो, हीच हादरवून टाकणारी घटना आहे. समाजाला सूक्ष्म गोष्टी कळणे कठीण झाले आहे. समाजानेच संतप्त व्हावे, असे काही नसतानाही हा प्रकार घडला आहे. अशा घटनांमुळे लेखकाला काठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले." बावीस्कर म्हणाले, " प्रदीर्घ, गौरवशाली प्रवास असलेला दिवाळी अंक म्हणजे अक्षरोत्सव, ज्ञानोत्सव असतो. ज्ञान हाच प्रकाश आणि प्रकाश हेच ज्ञान, हे सूत्र दिवाळी अंकांतून प्रतीत होते. या अंकांनी वाचनसंस्कृती रुजवली आणि जोपासली. भाषा समृद्ध असेल तर संस्कृतीही समृद्ध होते. भाषा टिकविण्याचे, मूल्यव्यवस्था जपण्याचे काम या अंकांनी केले आहे."

प्रा. जोशी म्हणाले, 'दिवाळी अंकांनी जशा लेखकांच्या पिढ्या घडविल्या तशाच संपादकांच्या पिढ्याही घडविल्या. साहित्यातील सर्व नव्या प्रवाहांचे स्वागत दिवाळीअंकांनी केले, पुढे त्याच प्रवाहाचे स्वतंत्र दिवाळी अंक निघाले. दिवाळीअंकामुळे ललित साहित्य निर्मितीला मोठी चालना मिळाली. काही वर्षापूर्वी दिवाळी अंकांना जाहिरातीच्या रूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनाढय लोकांना आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटतं होते आज ती मानसिकता राहिलेली नाही त्यामुळे दिवाळी अंकांचे अर्थकारण हा चिंतेचा विषय आहे. आजच्या समाजात भौतिक समृद्धी येत असताना सांस्कृतिक समृद्धी यावी यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले व आभार प्रकाश पायगुडे यांनी मानले.