top of page

मसाप ब्लॉग  

कवींनी नव्या वाटा निर्माण केल्या पाहिजेत मसापच्या एक कवयित्री एक कवी कार्यक्रमात मांडला विचार


'मळलेल्या जुन्या वाटांवरून चालणं सोप काम असतं त्यात नवीन असं काही नसतं. पण प्रतिभावंतांनी मनाची मशागत करणाऱ्या नव्या वाटा निर्माण केल्या पाहिजेत. असे मत प्रसिद्ध कवी प्रकाश घोडके आणि कवयित्री संजीवनी बोकील यांनी मांडले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अभिनव उपक्रम एक कवयित्री एक कवी या कार्यक्रमात adv. प्रमोद आडकर आणि ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी या दोन्ही कवींची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. संजीवनी बोकील म्हणाल्या काव्यनिर्मितीची प्रक्रिया सगळ्यात अवघड असते. काव्य जन्माला येताना जाणिवा आणि नेणिवेची प्रगल्भता फार मोलाची असते. शुभ्र पक्षांचा थवा आकाशातून विहरावा तसा प्रतिभावंत काव्यानुभवात विहरत असतो. बालवयातच कविता संवेदनांचं आकाश बनून श्वासात घर करून बसली. कवितेचे ऋण कधीच फेडता येणार नाही. कवी प्रकाश घोडके म्हणाले, 'कोणी म्हणत असेल की गेय कवितेनेच मराठी कवितेची वाट लावली तर हे म्हणनं चुकीचे आहे. उलट गेय कवितांनी मराठी कविता श्रीमंत केली. एवढेच नाही तर गेय कवींनीच मराठीत स्वतःच्या नव्या वाटा निर्माण केल्या आहेत. समीक्षकांना माझी कविता समजली नाही. माझ्या कवितेची समीक्षा झाली असती तर प्रकाश घोडके कवी म्हणून मोठे झाले असते. मला मोठे होऊ द्यायचे नव्हते, म्हणून माझ्या कवितांची समीक्षा झाली नाही.

प्रकाश घोडके आणि संजीवनी बोकील या दोघांनी एका पाठोपाठ एक अशा कसदार कविता सादर करून रसिकांची उस्फूर्त दाद मिळवली. प्रकाश घोडके यांनी त्यांच्या 'असा बावळा सावळा' अशा तुझ्या आठवणी, धर्मपीठ, तुझ्या दाराहून जाता या गेय कविता सादर केल्या. कवयित्री संजीवनी बोकील यांनी त्यांच्या मूर्तीकार, काळीजकूपी, आर्जव, एकांत रेघेवर या दर्जेदार कविता सादर करून रसिकांची प्रचंड दाद मिळवली. रसिकांच्या प्रतिसादामुळे हा कार्यक्रम रंगतदार झाला. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कवींचा सत्कार केला. कार्यवाह उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. पुणे शहर प्रतिनिधी सदस्य शिरीष चिटणीस यांनी आभार मानले.



Featured Posts
Recent Posts
Archive
Search By Tags
No tags yet.
Follow Us
  • Facebook Basic Square
  • Twitter Basic Square
  • YouTube Social  Icon
bottom of page