"द. भि. हे वाङमयप्रेमाने झपाटलेला महावृक्ष होते"
प्रा. मिलिंद जोशी; मसापतर्फे 'स्मरण द. भिंचे' कार्यक्रम

साठोत्तरी मराठी समीक्षेचे पात्र द. भिंनी आपल्या समीक्षा लेखनातून अधिक रुंद केले. ते अभिरुचीशी प्रामाणिक असणारे व्रतस्थ समीक्षक होते. त्यांच्या अभिरुचीचा भंग करणाऱ्या साहित्याची त्यांनी कधीही भलावण केली नाही. महाकाव्य ते महाकथा अशी द. भिंच्या समीक्षेची झेप होती. द. भि. हे वाङमयप्रेमाने झपाटलेला महावृक्ष होते असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि स्वायत्त मराठी विद्यापीठ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने 'स्मरण द. भिंचे' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बदलापूरच्या स्वायत्त मराठी विद्यापीठाचे संस्थापक श्याम जोशी, प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर, साहित्यिक भारत सासणे, पदमगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होत्या.
प्रा. जोशी म्हणाले, "प्राचीन ते अर्वाचीन अशा मराठी साहित्य प्रवाहाची समीक्षा द. भिंनी केली.
भारतीय साहित्य शास्त्रातील अलौकिकता वाद आणि मर्ढेकरांचा सौन्दर्यवाद यांच्या एकिकरणातून साकारलेल्या 'नवअलौकिकतावाद' ची तात्विक बैठक त्यांच्या समीक्षेला लाभलेली होती. मराठीतील अध्यात्मनिष्ठ साहित्याचे नवे आकलन त्यांच्या समीक्षेने दिले. भाव काव्यमयता आणि विश्ववात्सल्य हे श्रेष्ठ साहित्याचे निकष द. भिंनी मानले. कलावंतांची सर्जनशीलता आणि विचारवंतांची चिंतनशीलता यांचा सुरेख संगम त्यांच्या समीक्षा लेखनात होता. उत्तम कलाकृतींचे सर्जन आणि दुय्यम कलाकृतींचे हनन हा समीक्षा धर्म द. भिंनी प्राणपणाने आचरणात आणला.

सासणे म्हणाले, 'चिंतनशील बैठक आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व हे दभिंचे अंगभूत वैशिष्ट्य होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेममय होते. ते इतरांना सतत मार्गदर्शन करत असत. त्यांच्या समीक्षा एका आपसूक लयीत प्रकट होत असत. त्या मौलिक आणि मूलगामी होत्या.
जाखडे म्हणाले, 'मला प्रकाशन क्षेत्रात वाङ्मयीन मार्गदर्शन करणारे जे मार्गदर्शक मिळाले त्यांच्यापैकी एक द. भि. कुलकर्णी होते. त्यांच्या सहवासामुळे मी समृद्ध झालो. साहित्य व्यवहारात मला कोणतीही अडचण निर्माण झाल्यास द. भि. चे नेहमीच पाठबळ मिळायचे.'
श्याम जोशी म्हणाले, 'वादग्रस्त व्यामिश्र, अनुभवसंपन्न आणि ललितकलाचातुर्य असणारे विद्वान, असे द. भि. होते. त्यांच्या नावे ग्रंथ लिहायचा झाला, तर त्याचे नाव 'दभि एक महाभारत' असेच ठवावे लागेल. समीक्षा किती लालित्यपूर्ण होऊ शकते यांचा वस्तुपाठ म्हणजे त्यांचे लेखन.'या प्रसंगी रवींद्र गुर्जर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. वि. दा. पिंगळे यांनी आभार मानले.