"मसापत रंगली विविधरंगी कथेची संध्याकाळ"
कधी खळखळून हसणाऱ्या.... तर कधी हळव्या करणाऱ्या... तर कधी गूढतेचा अनुभव देणाऱ्या... तर कधी अंतर्मुख करणाऱ्या कथा ऐकताना रसिकांनी अनोखा अनुभव घेतला. निमित्त होते मसाप पुणे आणि एकपात्री कलाकार परिषद आयोजित 'विविधरंगी कथाकथनाच्या कार्यक्रमाचे' आयोजन करण्यात आले होते. कथाकार कल्पना देशपांडे यांनी उत्कंठापूर्ण 'शब्द' ही कथा सादर केली. विजय कोटस्थाने यांनी 'शुभमंगल सावधान' ही स्वरचित विनोदी कथा सादर केली. भावना प्रसादे यांनी कॉलेज जीवनातील कथा सादर केली. मकरंद टिल्लू यांनी 'पावसातला पाहुणा' ही गुढ कथा सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. हेमा कोळपकर यांनी 'तसंच असतं ते' ही अंतर्मुख करणारी विनोदी कथा सादर केली. अशोक मुरुडकर यांनी 'दळण' ही कथा सादर केली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, एकपात्री परिषदेचे अध्यक्ष विजय कोटस्थाने, मकरंद टिल्लू , सौ. कल्पना देशपांडे, भावना प्रसादे, हेमा कोळपकर, अशोक मुरुडकर उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ' कथा हा वाङमय प्रकार सर्वांनाच आवडतो. कथा कथनाने महाराष्ट्राची श्रवणसंस्कृती समृद्ध केली. कथा कथनात वक्तृत्व साहित्य आणि नाट्य यांचा सुरेख संगम आहे. द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, गदिमा, शंकर पाटील, वामन होवाळ यांच्या नंतर नव्या कथाकथनकाराची पिढी तयार होणे गरजेचे आहे, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने हा उपक्रम राबविला आहे. यावेळी मसापचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, उद्धव कानडे, दीपक करंदीकर उपस्थित होते.