'मसाप' च्या युवा साहित्य - नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी संदीप खरे' २५ आणि २६ फेब्रुवारील

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा रत्नागिरी आणि अ. भा. मराठी नाट्यपरिषद रत्नागिरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा साहित्य नाट्य संमेलन २५ आणि २६ फेब्रुवारीला रत्नागिरीला होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची निवड करण्यात आली आहे. किरण सामंत हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण उच्च आणि तंत्रशिक्षण राज्य मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र वायकर आणि आखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाला आमदार उदय सामंत, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, विभागीय संमेलनाचे निमंत्रक पद्माकर कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप आणि विनोद कुलकर्णी, मसापचे कोकणातील प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, मसाप रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष डॉ. सुभाष देव, संयोजक अनिल दांडेकर यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, " युवकांच्या साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मसापतर्फे या युवा साहित्य नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. प्रतिभेच्या नव्या कवडशांचा शोध घेणे हेच या संमेलनाचे उद्दिष्ट आहे. संदीप खरे हे तरुण पिढीचे आवडते कवी आहेत कसदार काव्यनिर्मिती करताना साहित्यापासून दुरावलेल्या तरुण पिढीला साहित्याकडे आणि विशेषतः कवितेकडे आकृष्ट करण्यात खरे यांचे मोठे योगदान आहे. म्हणून त्यांची या युवा साहित्य नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करताना आनंद होत आहे.
या संमेलनात नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर आणि गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते स्थानिक रंगकर्मीचे सत्कार करण्यात येणार आहेत. आसावरी शेटये यांच्या कवितांवर आधारित रंगमंचीय आविष्कार प्रदीप शिवगण आणि सहकारी सादर करणार आहेत. पहिल्या दिवसाचा समारोप चतुरंग गणेश गुळे निर्मित पुरुषार्थ या एकांकिकेच्या सादरीकरणाने होणार आहे. दुसऱ्या दिवशी संमेलनाध्यक्ष संदीप खरे यांची प्रकट मुलाखत आणि कवितावाचनही होणार आहे. निमंत्रित युवा कवींचे कविसंमेलन होणार असून त्यात विजय बिळूर, विजय सुतार, सायली पिलंकर, अमेय गोखले, ऋजुता कुलकर्णी, ज्योती अवसरे-मुळे हे कवी सहभागी होणार आहेत. आम्ही काय वाचतो आणि का वाचतो ? या विषयावरील परिसंवादात वेदवती मसुरकर, वसुमती करंदीकर, विनिता मयेकर आणि ओंकार मुळे हे युवक सहभागी होणार आहेत. तरुण पत्रकार विनोद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार आहे. तसेच समारोपाच्या सत्रात अभिनेते मनोज कोल्हटकर यांना रत्नभूषण पुरस्कार, नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
संमेलनाची वैशिष्ट्ये : * महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा रत्नागिरी आणि अ. भा. मराठी नाट्यपरिषद रत्नागिरी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने होणार संमेलन
* अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत सावरकर आणि पूर्वाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांची विशेष उपस्थिती
* या संमेलनाची सुरुवात नांदीने होणार असून रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेचे युवा कलाकार ती सादर करणार * उदघाटनापूर्वी रत्नागिरीच्या गंगाधरपंत गोविंद पटवर्धन हायस्कूलचे विध्यार्थी मराठी अभिमान गीत सादर करणार * सावरकरांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी सावरकरांची गीते युवाकलाकार समूहाने सादर करणार * नटराजवंदना आणि भरतनाट्यमही स्थानिक युवा कलाकार सादर करणार
* संमेलनाध्यक्ष संदीप खरे यांची प्रकट मुलाखत आणि कवितावाचनाचा कार्यक्रम होणार * 'वस्त्रहरण' या नाटकाच्या गमतीजमती गंगाराम गवाणकर सांगणार
* संमेलनात सादर होणार गणेश गुळे निर्मित 'पुरुषार्थ' ही एकांकिका