"नवोदित कवींनी साहित्य लेखनासाठी भाषेचा अभ्यास करावा" : अरुण म्हात्रे

नवोदित कवींनी साहित्य लेखनासाठी भाषेचा अभ्यास करावा आणि पूर्वसुरींच्या वाङमयाचा डोळस व्यासंग करणं आवश्यक आहे आणि अल्पाक्षरी हा काव्याचा गुण आत्मसात करायला हवा. असे प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नवोदित कवींना देण्यात येणाऱ्या, कै. सुहासिनी इर्लेकर स्मृती पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कवी अरुण म्हात्रे, पुरस्कार प्राप्त कवी अभिजित थिटे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होत्या.
मराठी मध्ये साहित्य लिहिणाऱ्या कवींची संख्या वाढत आहे, पण आशयसंपन्न आणि दर्जेदार कवितांचा अभाव आहे. त्यासाठी नवोदितांना सजग राहायला हवे असेही ते म्हणाले. त्यांच्या हस्ते, कै. सुहासिनी इर्लेकर पुरस्कार 'मुक्तक' या कवितासंग्रह साठी पत्रकार व कवी अभिजित थिटे यांना प्रदान करण्यात आला. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ' अंतःकरण उसवल्याशिवाय कसदार कविता लिहिता येत नाही. कवीकडे केवळ जीवननिष्ठा नव्हे तर काव्यनिष्ठाही असावी लागते. पोकळ शब्दांपेक्षा, प्रतिभेचे साधनेचे आणि अनुभवाचे संचित लेखनामागे असावे लागते. अभिजित थिटे हा सूर गवसलेला आश्वासक कवी आहे. त्यांच्या कवितेचा प्रवास जाणिवेपासून नेणिवेपर्यंत झालेला आहे. कवी अभिजित थिटे म्हणाले, ' हा पुरस्कार माझे बळ वाढवणारा आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी तो मार्गदर्शक ठरेल.' धनंजय तडवळकर आणि मृणालिनी कानेटकर जोशी यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी ग्रंथनिवडीचे काम केले. समितीच्या वतीने, मृणालिनी कानेटकर - जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह दीपक करंदीकर यांनी आभार मानले व कार्यवाह बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.