"भारताने १०४ उपग्रह अवकाशात सोडले तरीही चौकाचौकात लिंबू-मिर्च्या विकल्या जातात" : डॉ. संतो
'मसाप मध्ये विज्ञान दिनानिमित्त विशेष व्याख्यान'


'१९४७ साली भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, तरी कालबाह्य परंपरांविषयी भारतीयांची मानसिक गुलामगिरी अजूनही संपलेली नाही. त्यामुळेच आपण एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडले तरीही चौकाचौकात लिंबू-मिर्च्या विकल्या जातात. एवढेच नव्हे तर त्याचे वैज्ञानिक स्पष्टीकरणही दिले जाते. याचे कारण आपण विज्ञानाची सृष्टी स्वीकारली पण वैज्ञानिक दृष्टी स्वीकारली नाही.' असे मत भाभा अणुसंशोधन संस्थेतील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. संतोष टकले यांनी केले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विज्ञान दिनानिमित्त "विश्वाचे अंतरंग वैज्ञानिक वृत्तीने जाणून घेऊ" या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. संतोष टकले, यशवंत घारपुरे, मसापचे कार्यवाह प्रमोद आडकर उपस्थित होते. डॉ. टकले म्हणाले, 'महास्फोटाने सुरु झालेले हे विश्व काही नियमांनी बद्ध आहे. विश्वात सुरु असणाऱ्या घटनांचा जगातील कोणत्याही धर्माशी कसलाच संबंध नाही. त्यात पुढे पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर सजीवांची निर्मिती झाली आणि उत्क्रांतीही झाली, आकाशगंगेच्या दोनशे अब्ज सूर्यमालिका असून त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी एक लाख प्रकाशवर्ष लागतील. अशा १०० अब्ज सूर्यमालिका आपण शोधून काढल्या आहेत. आणि हा संपूर्ण विश्वाचा जेमतेम पाच टक्के भाग आहे."
सूत्रसंचालन मसापचे कार्यवाह दीपक करंदीकर यांनी केले. प्रास्ताविक विज्ञान परिषदेच्या कार्यवाह प्राचार्य नीता शाह यांनी केले. वक्त्यांचा परिचय प्रा. विनय र. र. यांनी केला.