'लोकशाहीचे मांगल्य धोक्यात' : उल्हासदादा पवार
'मसाप'ने केले यशवंतरावांचे स्मरण

पुणे : 'धर्म, जात, समाज, भाषा यांवर आधारित राजकारण करून मतांसाठी भावनिक आवाहन करीत जनतेची दिशाभूल करणे यशवंतरावांना कधीही रुचले नाही. अलीकडील काळात मात्र हे चित्र बदलले आहे. राजकारण्यांची तथ्यहीन वक्तव्ये, अपप्रवृत्ती, संकुचितपणा यामुळे लोकशाहीचे मांगल्यच धोक्यात आले आहे. ' असे मत उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात 'आठवणीतले यशवंतराव' या विषयावर पवार बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार व्यासपीठावर उपस्थित होते. पवार म्हणाले, 'ब्राम्हण ब्राह्मणेतर चळवळ, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विविध विचारांचा अभ्यास करून समाजहितासाठी योग्य ती विचारसरणी अवलंबणारे यशवंतराव लोकनेते होते. स्वतःवरील टीकेला उत्तर देताना त्यांनी कधीही अपशब्दांचा वापर केला नव्हता.'
'अत्रेंचे वृत्तपत्र वाचतच नाही' यशवंतराव चव्हाण यांची आठवण सांगताना पवार म्हणाले, 'आचार्य अत्रे यांनी दैनिक मराठा वृत्तपत्रात यशवंतरावांवर अत्यंत जोरदार टीका करणारा अग्रलेख लिहिला होता. विधान परिषदेत अत्रे, चव्हाण यांच्या उपस्थितीत त्या दिवशी लक्षवेधीचा तास संपल्यानंतर दत्ता शेंडे यांनी सभागृहातच त्या अग्रलेखाबाबत यशवंतरावांकडे विचारणा केली. त्याला उत्तर देताना यशवंतरावांनी प्रथम सभागृहासमोर अत्रेंच्या साहित्याचे वर्णन केले. त्यानंतर ते म्हणाले की, 'अत्रेंची ही दर्जेदार साहित्यिक प्रतिमा माझ्या मनात मालिन होऊ नये म्हणून मी अलिकडे मराठा वृत्तपत्र वाचतच नाही.' अतिशय समर्पक भाषेत यशवंतरावांनी केलेले हे विधान म्हणजे लोकशाहीतील चर्चा कशी असावी याचा आदर्श आहे.'

प्रा. जोशी म्हणाले, ' यशवंतरावांनी तोडफोडीचे राजकारण न करता सहमतीचे राजकारण केले. त्यांनी सर्व जाती-धर्मातून राजकीय नेतृत्व पुढे यावे यासाठी प्रयत्न केले. युवकांना संधी दिली. त्यांनी राजकारणात मतभेदाचे रूपांतर मनभेदात होऊ दिले नाही. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती तर केलीच त्याचबरोबर सुसंस्कृत राजकारणाचा पाया घातला.' त्यांचे 'कृष्णाकाठ हे आत्मचरित्र म्हणजे अक्षरलेणे आहे. प्रकाश पायगुडे यांनी पवार यांचा परिचय करून दिला. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.