विनोदी कथा लिहिणे सर्वांत अवघड काम 'कथा-सुगंध' कार्यक्रमात मंगला गोडबोले यांचे मत

'किस्सा, चुटका आणि विनोदी कथा यात खूप फरक आहे. विनोदी कथा ही प्रथम कथा असावी लागते. त्यात तर्क टिकवून विनोद निर्मिती करायची असते. त्यामुळेच विनोदी कथा लिहिणे सर्वात अवघड काम आहे.' असे मत ज्येष्ठ कथालेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' कार्यक्रमात कथेमागची कथा उलगडून दाखविताना त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सनीताराजे पवार उपस्थित होते. गोडबोले यांच्या 'आईच्या हातची आमटी' आणि 'पायरी' या कथांचे अभिवाचन शुभांगी दामले, जान्हवी देशपांडे, हर्षद राजपाठक आणि प्रमोद काळे यांनी केले.
गोडबोले म्हणाल्या, "विनोदी कथा लिहिताना खूप कारागिरी करावी लागते.

या कारागिरीला कथेच्या सूचण्यापासूनच सुरुवात होते. काव्यात्म अनुभव व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य घेताना काही कथाकार खूप पसरट कथा लिहितात. विनोदी कथेत गोळीबंद अनुभव मांडता आला तरच ती कथा जमते. मानवी जीवनाच्या अमर्याद शक्यतांना कथा कवेत घेते म्हणून तिचे मोल अधिक आहे. आज समाजातल्या सर्वच स्तरातील आणि क्षेत्रातील दांभिकता चिंताजनक आहे. त्यावर बोट ठेवण्यासाठी विनोद हे प्रभावी माध्यम आहे. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.