मसाप करणार 'ग्रंथाळलेल्या हातांचा' सन्मान
पुस्तकदिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. बहुलकरांच्या हस्ते होणार सन्मान
त्यांचे स्वतःच्या मालकीचे किंवा भाड्याचे पुस्तकाचे दुकान नाही... त्यांचा साहित्य संमेलनातल्या ग्रंथप्रदर्शनात गाळा नसतो... त्यांचा साहित्य संमेलनातील पुस्तकविक्रीच्या कोटीच्या कोटी उड्डाणांशी दुरान्वयानेही संबंध नसतो... तळपणारे ऊन असो, कोसळणारा पाऊस असो, की कडाक्याची थंडी असो, त्यांच्या ग्रंथसेवेत कसलाही खंड पडत नाही... फायदा - तोट्याचा विचार न करता त्यांच्या तीन - चार पिढ्या हे ग्रंथसेवेचे काम व्रत म्हणून करीत आहेत... ना त्यांना कधी व्यासपीठ मिळाले... ना पुरस्कारांनी त्यांची कधी दखल घेतली... त्यांच्यामुळेच डॉ. रा. चिं. ढेरेंसारख्या श्रेष्ठ संशोधकाला संशोधनाची सामग्री मिळाली... त्यांच्या मुळेच अनेक जुनी पुस्तके नष्ट होण्यापासून वाचली... त्यांच्या मुळेच अनेकांच्या हाती जुन्या दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आला... अशा निरपेक्ष वृत्तीने ग्रंथसेवा करणाऱ्यांचा सन्मान पुस्तकदिनाच्या पूर्वसंध्येला केला जाणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि स्वायत्त मराठी विद्यापीठ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शनिवार दि. २२ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६. ३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते समीर अब्दुलगनी कलारकोप, प्रभाकर रामचंद्र सांळुखे, पोपट महादेव वाबळे, लक्ष्मी पोपट वाबळे, प्रशांत खंडेराव कदम, राजेंद्र मल्हारी लिंबोरे, धनंजय जयंत आठवले या जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्या ग्रंथसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या समारंभाला मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, स्वायत्त मराठी विद्यापीठाचे संस्थापक श्याम जोशी, सल्लागार रवींद्र गुर्जर उपस्थित राहणार आहेत. प्रा. जोशी म्हणाले, 'साहित्य व्यवहाराच्या नकाशावर ज्यांना स्थान नाही तरीही ज्यांचे काम साहित्यव्यवहारासाठी पोषक ठरले आहे, अशा ग्रंथसेवकांचा सन्मान करणे हे परिषदेसारख्या संस्थेचे आद्य कर्तव्य आहे. नव्या पुस्तकांच्या निर्मिती आणि विक्री इतकेच मौल्यवान अशा जुन्या पुस्तकांच्या जतनाचे आणि वितरणाचे कामही तितिकेच महत्वाचे आहे. ते काम ही मंडळी सर्व प्रकारच्या असुविधांवर मात करीत पुढे नेत आहेत. म्हणून या ग्रंथाळलेल्या हातांच्या सन्मानाचा अनोखा कार्यक्रम परिषदेने पुस्तकदिनाच्या निमित्ताने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम म्हणजे कृतज्ञतेची ओंजळच आहे.