मसाप ब्लॉग  

"ग्रंथसेवकांचे ऋण न फिटणारे" : डॉ. श्रीकांत बहुलकर

April 24, 2017

'मसाप'ने केला 'ग्रंथाळलेल्या हातांचा' सन्मान

अनेक दुर्मिळ आणि संशोधनासाठी उपयुक्त ग्रंथ ग्रंथालयात असत नाहीत. असले  तरी ते मिळत नाहीत पण हेच ग्रंथ जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्या ग्रंथसेवकांकडे मिळतात. त्यांची किमंत कमी असली तरी अशा दुर्मिळ पुस्तकांचे मोल करता येत नाही म्हणूनच अशी पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या ग्रंथसेवकांचे ऋण न फिटणारे आहे. असे मत भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी व्यक्त केले.    महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि स्वायत्त मराठी विद्यापीठ बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. बहुलकर यांच्या हस्ते समीर अब्दुलगनी कलारकोप, प्रभाकर रामचंद्र सांळुखे, प्रशांत खंडेराव कदम, राजेंद्र मल्हारी लिंबोरे, पोपट वाबळे, लक्ष्मी वाबळे, कपिल पराडकर, दत्तात्रय जयवंत जोशी या जुन्या पुस्तकांची विक्री करणाऱ्या ग्रंथसेवकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते  बोलत होते. व्यासपीठावर  मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, स्वायत्त मराठी विद्यापीठ बदलापूरचे संस्थापक श्याम जोशी, सल्लागार आणि प्रसिद्ध अनुवादक रवींद्र गुर्जर, उपस्थित होते

बहुलकर म्हणाले, ' अनेक महत्वाच्या पुस्तकांचे पुर्नमुद्रण होत नाही त्यामुळे ही पुस्तके जुनी पुस्तके विकणाऱ्या ग्रंथसेवकांकडेच उपलब्ध होतात. अशा पुस्तकांमुळेच ग्रंथालये आणि संशोधक समृद्ध होतात. 

प्रा.  जोशी म्हणाले, 'साहित्य व्यवहाराच्या नकाशावर ज्यांना स्थान नाही तरीही ज्यांचे काम साहित्यव्यवहारासाठी पोषक ठरले आहे, अशा ग्रंथसेवकांचा सन्मान करणे हे परिषदेसारख्या संस्थेचे आद्य कर्तव्य आहे. नव्या पुस्तकांच्या निर्मिती आणि विक्री इतकेच मौल्यवान अशा जुन्या पुस्तकांच्या जतनाचे आणि वितरणाचे कामही तितिकेच महत्वाचे आहे. ते काम ही मंडळी सर्व प्रकारच्या असुविधांवर मात करीत पुढे नेत आहेत. त्यांच्यामुळे जुनी पुस्तके नष्ट होण्यापासून वाचली आहेत. म्हणून या ग्रंथाळलेल्या हातांच्या सन्मानाचा अनोखा कार्यक्रम परिषदेने पुस्तकदिनाच्या निमित्ताने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम म्हणजे कृतज्ञतेची ओंजळच आहे. 

या कार्यक्रमात श्याम जोशी यांनी सत्कारार्थींचा परिचय करून दिला. रवींद्र गुर्जर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्धव कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. 

तो अनमोल ग्रंथ ग्रंथविक्रेत्यांमुळेच परत आला 

 या कार्यक्रमात डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली. भांडारकरच्या ग्रंथालयातून एक नामवंत संशोधकाने एक महत्वाचा ग्रंथ अभ्यासासाठी घरी नेला. ग्रंथालयाची मुदत संपताच नूतनीकरण करून त्यांनी अनेक वर्षे तो ग्रंथ त्यांच्या संग्रही ठेवला त्याच्या निधनानंतर तो ग्रंथ रस्त्यावर ग्रंथ विक्री करणाऱ्या ग्रंथ विक्रेत्याकडे आला. भांडारकर संस्थेचा शिक्का पाहून त्या ग्रंथ विक्रेत्याने तो ग्रंथ भांडारकरमध्ये आणून दिला. तो ग्रंथ नव्याने विकत घेणे शक्यच नव्हते आणि खूप पैसे मोजूनही तो विकत मिळणार नव्हता इतका तो अनमोल होता त्या सच्या ग्रंथप्रेमींमुळे तो परत मिळाला. हा अनुभव बहुलकरांच्या तोडून ऐकताना सभागृह स्तब्ध झाले. 

 

 

Please reload

Featured Posts