top of page

मसाप ब्लॉग  

'मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री यां


मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात आपण स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तीशः पाठपुरावा करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भिलार येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय मसापने घेतला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, खंडेराव धरणे, पो.नि. रविंद्र पिसाळ, भाजपच्या प्रवक्त्या कांताताई नलावडे यांनी साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आणि पाचगणीच्या हेलिपॅडवर जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची व साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाशी भेट घडवून दिली. यावेळी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सौ. सुनिताराजे पवार, सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रविंद्र बेडकिहाळ, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्यवाह वि.दा.पिंगळे, दीपक करंदीकर, पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे व माजी आमदार कांताताई नलावडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी प्रा मिलिंद जोशी म्हणाले मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने 90 हजार पत्रे पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दखल घेऊन कार्यवाहीबाबत केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला कळवले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अवर सचिव कंवरजित सिंग यांनीही पत्र पाठवले असून त्यात मद्रास उच्च न्यायालयात याबाबत असलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे त्यामुळे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने कार्यवाही सुरु केल्याचे कळवले आहे आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण प्राधान्याने हा प्रश्न मार्गी लावावा. आमच्या निवेदनाची दखल घेऊन हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली.


यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, आपण स्वतः पंतप्रधान मोंदी यांच्याशी चर्चा केल्यास या प्रश्नावर तातडीने तोडगा निघू शकेल. शिष्टमंडळाची चर्चा करताना मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या निवेदनाची दखल मी घेतलीच आहे. न्यायालयातील प्रश्न निकाली निघाल्यामुळे यासंदर्भातील हालचाली सुरु झाल्या आहेत. मी स्वतः पंतप्रधानाशी बोलून व्यक्तीशः याचा पाठपुरावा करणार आहे. आपल्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय मंत्रीमंडळात याबाबत लवकरच निर्णय होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

भिलार गावात आंदोलन करण्यासाठी अॅड. चंद्रकांत बेबले, संजय माने, वजीर नदाफ, सचिन धुमाळ, सतीश घोरपडे, सुरेंद्र वारद, प्राचार्य रविंद्र येवले, शाहुपुरी, फलटण शाखेसह सातारा जिल्हयातील सर्व शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मर्ढेकरांच्या भूमीत कवितेचे गाव

कविवर्य बा.सी.मर्ढेकर यांची जन्मभूमी असलेल्या सातारा तालुक्यातील मर्ढे या गावी भिलारप्रमाणेच कवितेचे गाव संकल्पना राबवावी अशी मागणी यावेळी मसापच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आपण याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठवावा. आपण याबाबत सकारात्मक कार्यवाही करु.


Featured Posts
Recent Posts
Archive