'मसाप जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ वैयाकरणी यास्मिन शेख यांना आणि 'भीमराव कुलकर्णी कार्यकर
२७ मे रोजी १११ व्या वर्धापनदिन समारंभात पुष्पा भावे यांच्या हस्ते होणार वितरण

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १११ व्या वर्धापनदिन समारंभाच्या निमित्ताने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'मसाप जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ वैयाकरणी यास्मिन शेख यांना आणि भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि कार्यवाह उद्धव कानडे यावेळी उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, 'यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्ताने भाषाशाश्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले आयुष्य वाहून घेतले. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली. त्यांच्या भाषाविषयक निरपेक्ष सेवेचा आणि तळमळीचा सन्मान करताना मसापला आनंद होत आहे. डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराचे मानकरी नगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख आणि श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांनी जवळ जवळ ३२ वर्ष मसाप कार्यकारिणीवर नगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले. ते दहा वर्ष मसा पत्रिकेचे संपादक होते नगरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. नगर जिल्ह्यात मसाप शाखेच्या विस्तारात त्यांनी मोलाचे योगदान दिले. घटना समितीचे ते निमंत्रक होते.
निमंत्रण पत्रिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा
' मसाप उत्कृष्ट शाखा पुरस्कार चाळीसगाव शाखेला'. नंदा सुर्वे आणि नंदकुमार सावंत यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार 'या वर्षीचा राजा फडणीस पुरस्कृत मसाप उत्कृष्ट शाखा पुरस्कार मसापच्या चाळीसगाव शाखेला देण्यात येणार आहे. तसेच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा 'मसाप उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार' मसापच्या माजी कार्यवाह नंदा सुर्वे व नंदकुमार सावंत यांना देण्यात येणार आहे.' अमृतमहोत्सवी वर्षात वाटचाल करणाऱ्या मसापच्या सोलापूर शाखेचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
२६ मेला होणार ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार वितरण प्रसिद्ध कन्नड लेखिका वैदेही यांच्या हस्ते वितरण पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने १११ व्या वर्धापनदिन समारंभाच्या निमित्ताने शुक्रवार दि. २६ मे रोजी ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कन्नड लेखिका वैदेही प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ सायं. ५.३० वाजता विद्या प्राधिकरणचे महात्मा फुले सभागृह, कुमठेकर रोड, पुणे येथे होणार आहे. कार्यवाह उद्धव कानडे यांनी विविध ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कारांची घोषणा यावेळी केली. इतर भाषांतील साहित्यिक असणार यापुढे मसापच्या वर्धापनदिनाचे प्रमुख पाहुणे 'मसाप' ने १११ व्या वर्धापनदिन समारंभापासून प्रतिवर्षी या समारंभासाठी इतर भाषांतील नामवंत साहित्यिकास प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्याचे ठरविले आहे. ही प्रथा पुढेही सुरु राहील. यापूर्वी केवळ अ. भा. मराठी साहित्य संमेलनातच इतर भाषांतील साहित्यिकांना निमंत्रित केले जात होते.