चित्रकार चित्रांद्वारे वाड्मयाकडे वाचकांचे लक्ष वेधून घेतात" : सुहास बहुळकर

पुणे : दि. "पोथ्या-पुराणांमधल्या रेखाचित्रांपासून आलेली, पुस्तकांवरच्या चित्रांची परंपरा, ब्रिटिशांच्या कारकीर्दीत बदलली. तथापि, नंतरच्या कालखंडात, दीनानाथ दलालांसारख्या अनेक चित्रकारांनी मुखपृष्ठांवरच्या चित्राबाबत प्रयोग करून, त्यांना भारतीय कला-रूप दिले. तीच परंपरा चंद्रमोहन कुलकर्णींसारखे चित्रकार करत आहेत.' असे गौरवोद्गार प्रख्यात चित्रकार सुहास बहुळकर यांनी काढले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राजहंस प्रकाशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या, कै. रेखा ढोले स्मृती पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. 'अभिजात कला आणि उपयोजित कला यांच्या समन्वयातून वाचकांना वाड्यमयाकडे आकृष्ट करण्याचे मोलाचे कार्य चित्रकार करतात.' असेही ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, राजहंस प्रकाशनचे श्रीराम गीत, प्रवीण ढोले, वर्षा गजेंद्रगडकर उपस्थित होते.
उभा समारंभात कै. रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, 'केल्याने भाषांतर' या नियतकालिकासाठी, नियतकालिकाच्या संस्थापक-संपादक सुनंदा महाजन यांना रु. २५ हजार आणि सन्मानचिन्ह, 'रस्किन बॉण्ड' या पुस्तकाचे उंत्कृष्ट मुखपृष्ठ आणि अंतर्गत सजावटीसाठी चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या वतीने सौ. सरिता कुलकर्णी याना रु. १५ हजार आणि सन्मानचिन्ह, तर या पुस्तकाच्या निर्मितीमूल्यासाठी रोहन प्रकाशन, पुणेचे रोहन चंपानेरकर यांना रु. १० हजार आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या समारंभात ग्रंथनिवड समितीच्या सदस्य लेखिका वर्षा गजेंद्रगडकर म्हणाल्या, 'पुस्तकांचे अनुवादक केवळ दोन भाषांमधला दुवा नसतात तर दोन समाज - संस्कृती परंपरा यांना समन्वय साधून, त्यांना जोडतात आणि वाङ्मयाला श्रीमंत करतात. पुरस्काराच्या मानकऱ्यांच्या वतीने सुनंदा महाजन, सौ. सरिता कुलकर्णी आणि रोहन चंपानेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मनोगत नागेश मोने यांनी वाचून दाखवले. या समारंभाला राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर, पत्रकार सदा डुंबरे, अरविंद गोखले, लेखिका वंदना बोकील-कुलकर्णी, रवींद्र गुर्जर, चंद्रशेखर बर्वे. सु. रा. चुनेकर, भा. र. साबडे, चित्रकार रविमुकुल, मसापचे कार्यवाह उद्धव कानडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. कार्यवाह बंडा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.