"महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचा होणार कायापालट"
'आमदार जयदेव गायकवाड यांच्या आमदार निधीतून चार लक्ष रुपयांचा निधी मंजूर'
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय परिषदेच्या वैभवात मोलाची भर घालण्याचे काम करीत आहे. ५०,००० हून अधिक जुने - नवे ग्रंथ, दुर्मिळ नियतकालिके, सर्व प्रकारचे कोश, संदर्भग्रंथ त्यामुळे हे संदर्भ ग्रंथालय संशोधक आणि अभ्यासकांच्या नेहमीच आकर्षणाचा विषय राहिलेले आहे. परिषदेचे आजीव सभासद, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी, यांचा या ग्रंथालयात नेहमीच राबता असतो. या ग्रंथालयाचा आता कायापालट होणार आहे. आमदार जयदेव गायकवाड यांनी त्यांच्या आमदार निधीतून या कामासाठी चार लक्ष रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून हा कायापालट होणार आहे अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा. जोशी म्हणाले, 'मसापच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासकांचा, संशोधकांचा आणि वाचकांचा राबता दिवसेंदिवस वाढतो आहे. प्रत्येक लेखक आणि प्रकाशकाला आपले नवे पुस्तक या ग्रंथालयात असावे असे वाटते. त्यामुळे परिषदेच्या ग्रंथालयासाठी आवर्जून पुस्तके पाठविली जातात. पुरस्कारासाठी आलेली आणि मसापत्रिकेकडे अभिप्रायासाठी आलेली पुस्तकेही नंतर ग्रंथालयात जमा केली जातात. अगोदरच मौल्यवान अशा जुन्या संदर्भ ग्रंथांनी ग्रंथालयाचा बराचसा भाग व्यापलेला आहे त्यामुळे नव्या पुस्तकांसाठी जागा नव्हती त्यामुळे ही पुस्तके कपाटात ठेवण्याखेरीज पर्याय नव्हता. त्यामुळे वाचकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय आता दूर होणार असून ग्रंथ सहज चाळता येतील आणि वाचकांसाठी सहज उपलब्ध होतील अशा पद्धतीने फर्निचरच्या माध्यमातून मांडणी करण्यात येणार आहे. तसेच वाचकांना तिथे बसून ग्रंथ वाचता येतील यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. या कामासाठी आमदार जयदेव गायकवाड यांनी आमदार निधीतून चार लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच या कामाचा प्रारंभ करण्यात येईल. ग्रंथालयाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे म्हणाले, ' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने मसापने आयोजित केलेल्या बाबासाहेबांवरील ग्रंथप्रदर्शनाच्या उदघाटनासाठी आमदार जयदेव गायकवाड परिषदेत आले होते त्यावेळी त्यांनी ग्रंथालयाला भेट दिली. कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी त्यांना ग्रंथालयाच्या अद्ययावतीकरणासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. ग्रंथांची नीट देखभाल होण्यासाठी ग्रंथालयाचा कायापालट होण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी तातडीने हा निधी उपलब्ध करून दिला.'
कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचा इतिहास परिषदेचे संस्थापक चिटणीस कै. वा. गो. आपटे यांच्या नावाचा 'वा. गो. आपटे इस्टेट ट्रस्ट' सदाशिव पेठेत होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष श्री. म. माटे यांनी त्या ट्रस्टच्या विश्व्स्तांशी संपर्क साधून १९४९ साली १०,००० रुपयाची देणगी मिळवली, ट्रस्टच्या अटीनुसार आपटे यांच्या स्मरणार्थ संदर्भ ग्रंथालय उभारण्यात आले. १९५१ च्या मे महिन्यात वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाची प्रतिष्ठापना झाली. या ग्रंथालयातून दुर्मिळ आणि संदर्भात्मक ग्रंथ सोडून कोणतेही पुस्तक सभासदांना घरी वाचण्यासाठी दिले जाते. मसाप ग्रंथालयाचे आधुनिकीकरण आणि संगणकीकरणही लवकरच करण्यात येणार आहे. दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन करण्यासाठी परिषदेने सुरु केलेल्या 'ग्रंथ दत्तक योजनेला' साहित्यप्रेमींनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहनही प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.