"वर्धापनदिनी सारस्वतांच्या आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी 'मसाप' सज्ज"
'आकर्षक रांगोळी, सनई-चौघडा, चाफ्याची फुले आणि महाराष्ट्रगीताने होणार स्वागत'
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली ११० वर्षे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या या संस्थेचा १११ वा वर्धापन दिन २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायं. ५.३० वाजता ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्काराचे वितरण साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रसिध्द कन्नड लेखिका वैदेही यांच्या हस्ते होणार आहे.

या समारंभासाठी उपस्थित सारस्वतांचे आणि साहित्यप्रेमींचे स्वागत 'मसाप' तर्फे अनोख्या पद्धतीने करण्यात येणार आहे. शिक्षणशास्त्र संस्थेच्या कुमठेकर मार्गावरील महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. तिथे आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहे. रमेश आणि दत्तोबा पाचंगे यांच्या सनई-चौघडा वादनाने वातावरण मंगलमय होणार आहे उपस्थित सारस्वतांचे आणि साहित्यप्रेमींचे चाफ्याची फुले देऊन मसापतर्फे स्वागत करण्यात येणार आहे. या सोहळ्याची सुरुवात महाराष्ट्रगीताने होणार असून शाहीर मावळे आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्रगीत सादर करणार आहेत. नुकत्याच केलेल्या रंगकामामुळे नवी झळाळी मिळालेल्या परिषदेच्या इमारतीला वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. २७ मे रोजी मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत पुष्पा भावे यांच्या हस्ते, ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख यांना 'मसाप जीवनगौरव', डॉ. सु. प्र. कुलकर्णी यांना 'भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार', चाळीसगाव शाखेला मसाप उत्कृष्ट शाखा पुरस्कार, नंदा सुर्वे आणि नंदकुमार सावंत यांना रत्नाकर कुलकर्णी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार, अमृत महोत्सवी वाटचालीबद्दल मसाप सोलापूर शाखेला आणि सुवर्ण महोत्सवी वाटचालीबद्दल मराठी विज्ञान परिषदेला सन्मानित करण्यात येणार आहे.