मसाप ब्लॉग  

'मसाप' मध्ये रंगला 'कथासुगंध' कार्यक्रम

June 15, 2017

'लोकवाङ्मयातील कथांनीच समाजमनाला शहाणपण दिले' - डॉ. प्रतिमा इंगोले 

 

 पुणे  : जगभराच्या लोकवाङ्मयात प्रचंड कथासाहित्य आहे. कथा ही सांगण्यासाठीच असते. कथा कथनामुळे अक्षर ओळख नसणारे लोकही कथेचा आस्वाद घेऊ शकतात, या लोकवाङ्मयातील कथांनीच समाजमनाला शहाणपण दिले, असे मत प्रसिद्ध कथाकार डॉ. प्रतिमा इंगोले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित 'कथासुगंध' या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रतिमा इंगोले यांनी आपल्या खास वऱ्हाडी शैलीत मियाँ बीबी राजी आणि धूळमाती या कथा सादर करून रसिकांची मने जिंकली. 

 

डॉ. इंगोले म्हणाल्या, माझे पती वकील असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक पक्षकार येत असत. त्यांचे बोलणे ऐकताना मला कथेसाठी अनेक विषय मिळत गेले, त्यातूनच मी अनेक विनोदी आणि गंभीर कथा लिहिल्या. मी ज्यावेळी वऱ्हाडी भाषेत कथा लिहीत होते तेव्हा त्याची दखल घ्यायला मराठी साहित्य विश्व तयार नव्हते पण आज परिस्थिती बदलली आहे. कथा कथनामुळेच माझे नाव सर्वदूर पोचले. कथा जर दमदार आणि जगण्याचा परम मार्ग सांगणारी असेल तर तिचा सुगन्ध जगभर दरवळतोच आणि पुढच्या अनेक पिढ्या त्या सुगंधात न्हात राहतात. पूर्वी गोष्टी सांगताना त्याला कथाच म्हणत अथवा पोथ्या ऐकतानाही रामकथा चालू आहे असे म्हणत. कथा कथनाच्या वेळी एक त्रिकोण तयार होत असतो. त्यात तीन बिंदू असतात. कथा हा पहिला बिंदू, कथा सांगणारा हा दुसरा बिंदू तसेच कथा ऐकणारा तिसरा बिंदू  हे तिघेही जेव्हा सांधले जातात. तेव्हा एकात्म त्रिकोण तयार होतो. त्यालाच आपण कथाकथन म्हणतो. कथनाच्या परंपरेला त्यामुळेच ज्ञानेश्वरांची वाचे बरवे कवित्व ही ओवी तंतोतंत लागू पडते. फक्त कवित्वाच्या जागी कथनत्व असे म्हणावे लागेल. हे कथनत्व जगण्याची कला शिकवते, म्हणूनच कथा वर्षानुवर्षे टिकून आहे. जुन्या कथा अशाच होत्या. बोधकथा, नीतिकथा, व्यवहार चातुर्य कथा या कथाप्रकारांनी समाजाला कथेची आवड लावली. कथा सांगणारा सर्वाना बरोबर घेऊन जातो. त्यामुळे कथांना प्रकाशकाची गरज नसते त्याच प्रकाशक होतात. प्रत्येक कथेमागे एक कथा असतेच वास्तवातील कथेला कल्पनेत कलात्मक रूप देणे यातच कथाकाराचे कसब असते. 

सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

Please reload

Featured Posts

साहित्य परिषदेतील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु

January 18, 2018

1/4
Please reload

Recent Posts
Please reload

Archive