'कवी कालिदास दिनानिमित्त विशेष कार्यक्रम'
"परिषदेत बरसणार कवितेतला पाऊस"

मेघांची दाटी ... हिरवाईचा स्पर्श ... आसमंतात दरवळणारा मृदगंध ... आषाढाचा पहिला दिवस... पावसाची चाहूल आणि अबाल वृद्धांना भुरळ घालणारा सदा सनातन आणि तरीही चिरतरुण पाऊस ... त्याने महाकवी कालिदासापासून आजच्या कविपर्यन्त सर्वांना वेड लावले. आणि हा पाऊस गेल्या अनेक शतकांपासून कवितांमधूनही तितक्याच उत्कटपणे बरसतो आहे. लहानपणापासून शिकलेल्या ... ऐकलेल्या ... पाठ केलेल्या पावसाच्या कविता ... महाकवी कालिदासापासून ते बालकवी, केशवसुत, बोरकर, आरती प्रभू, मर्ढेकर, ग्रेस, अनिल, निकुंब, कुसुमाग्रज, बहिणाबाई, इंदिरा संत, पद्मा, ना. धो. महानोर ते थेट अरुणा ढेरेंपर्यंत अनेक नामवंत कवींच्या पावसाविषयीच्या कविता समाविष्ट असलेल्या आणि मराठी काव्यसृष्टीतील पावसाच्या थेंबाचा पाठलाग करणाऱ्या 'शब्दांचा पाऊस' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. कवी कालिदासदिनाच्या निमित्ताने होणारा हा विशेष कार्यक्रम २६ जून २०१७ रोजी सायं. ६. ३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शन डॉ. माधव मुतालिक यांचे असून ते व डॉ. मैत्रेयी मुतालिक हा कार्यक्रम सादर करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.