"जीएंच्या 'प्रदक्षिणा' कथेचे नाट्यरूपांतर पाहण्याची रसिकांना संधी"
'मसाप' तर्फे जीएंच्या ९४ व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम, 'जी. ए. पत्रास विनाकारण की' या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : आपल्या अलौकिक प्रतिभा सामर्थ्याने मराठी साहित्यातील कथेचे दालन समृद्ध करणारे कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या काजळमाया या कथासंग्रहातील 'प्रदक्षिणा' या कथेचे नाट्यरूपांतर पाहण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने १० जुलै रोजी सायं. ६.०० वा. ज्योत्स्ना भोळे सभागृहात जी. ए. कुलकर्णी यांच्या ९४ व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हे नाट्यरूपांतर सादर केले जाणार आहे. जवळीक सोलापूर या संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. संकल्पना आणि दिग्दर्शन शशिकांत लावणीस यांचे असून वनिता म्हैसकर, अशोक किल्लेदार ओंकार कुलकर्णी, सुहास मार्डीकर, तेजस्विनी चांदणे, शशिकांत लावणीस हे कलाकार त्यात सहभागी होणार आहेत. संगीत अभिराम सराफ आणि श्रीरंग सराफ यांचे असून प्रकाश योजना उमेश बटाणे यांची आहे. सुमीत फुलमामडी आणि वनिता म्हैसकर यांचे नेपथ्य आहे. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
'जी. ए. पत्रास विनाकारण की' या पुस्तकाचे प्रकाशन
याच कार्यक्रमात महेश आफळे लिखित, जी. ए. पत्रास विनाकारण की या पुस्तकाचे प्रकाशन दै. सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले यांच्या हस्ते होणार आहे. जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यांची उपस्थिती या समारंभाला लाभणार आहे.