"महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मराठी परीक्षांचा निकाल जाहीर"
'परिषदेचा निकाल ९७ टक्के, १७ शाळांचा निकाल १०० टक्के'
'९८ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत' 'जळगावची काजल पाटील सर्वांत प्रथम' पुणे : मराठी भाषेची अभिवृद्धी व तिचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच मुलांना मराठीची गोडी लागावी, भाषा व साहित्याच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद गेली ७९ वर्षे मराठीच्या विविध परीक्षांचे आयोजन करत आहे. ८० व्या वर्षांत पदार्पण करण्याऱ्या 'मसाप' परीक्षा विभागाचा २०१६ - १७ या शैक्षणिक वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. प्रथमा, प्रवेश आणि साहित्य प्राज्ञ परीक्षेला २१ शाळांमधील ८९४ विधार्थी बसले होते, त्यापैकी ८६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाचा परिषदेचा निकाल ९७ टक्के इतका आहे. १७ शाळांचा निकाल १०० टक्के आहे. प्रथमा परीक्षेत ७८० पैकी ७५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९८ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जळगावच्या राष्ट्रीय कन्या शाळेतील विद्यार्थिनी काजल पाटील हिने ८६ टक्के गुण मिळवून एकूण विद्यार्थांत प्रथम क्रमांक पटकावला आहे. एकूण विद्यार्थांत ८५ टक्के गुण मिळवून पाच विद्यार्थी द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. दीक्षा घुसळे (चाळीसगाव), उत्कर्ष शिरुडे (चाळीसगाव), अस्मिता सुरवसे (सांगोला जि. सोलापूर), ऋषिकेश सरगर (नाझरा, ता. सांगोला), सौरभ घुले (बारामती) या विद्यार्थांना ८५ टक्के गुण मिळाले आहेत. ८४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवणारे तीन विद्यार्थी आहेत. सिद्धी भातुंगडे(सांगोला), सारिका देशमुख (चाळीसगाव), साक्षी जाने(चाळीसगाव) यांना ८४ टक्के गुण मिळाले आहेत. विशेष गुणवत्ता श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. प्रवेश परीक्षेत ७८ पैकी ७८ विद्यार्थी तर साहित्य प्राज्ञ परीक्षेत ३६ पैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण असून या दोन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के आहे. प्रथमा १०० गुणांची, प्रवेश २०० गुणांची आणि प्राज्ञ परीक्षा ३०० गुणांची असते. प्रवेश आणि प्राज्ञ परीक्षांचा निकाल १०० टक्के असला, तरी प्रथमा परीक्षेच्या तुलनेत यातील गुणांची टक्केवारी कमी आहे. अशी माहिती परीक्षा विभागाचे कार्यवाह माधव राजगुरू यांनी दिली.