नवकथेला आलेले साचलेपण जीएंच्या कथांनी दूर केले : प्रा. मिलिंद जोशी
'जी.एं. पत्रास विनाकारण की' या पुस्तकाचे प्रकाशन; साहित्य परिषदेतर्फे कार्यक्रम

पुणे : स्थळकाळात असणारी मानवी आयुष्यातील सुखदुःखे आणि त्यांच्या तळाशी असणारे अविनाशी सत्य यांचे दर्शन जी. ए. कुलकर्णी यांनी आपल्या कथांमधून घडविले. अर्थसंपन्न प्रतिमासृष्टी आणि व्यामिश्र जीवनानुभूतीतील वेध लावणारी गूढता यामुळे त्यांच्या कथा वैशिष्टयपूर्ण ठरल्या. ठराविक रुपबंधांच्या साच्यामुळे नवकथेला आलेले साचलेपण जीएंच्या कथांनी दूर केले.' असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात महेश आफळे लिखित 'जी. ए. पत्रास विनाकारण की' या पुस्तकाचे प्रकाशन दैनिक सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले यांच्या हस्ते झाले. जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर, लेखक महेश आफळे, शशिकांत लावणीस, मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यावेळी उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, ' जीएंच्या कथांना महाकाव्याची व्याप्ती आणि प्रतिष्ठा आहे. असांकेतिक अनोख्या आक्षेपार्ह मानवी जीवनव्यवहाराला आणि मनोव्यापाराला त्यांच्या कथांनी कवेत घेतले. जी. ए. कुलकर्णी हे हरतर्हेच्या सतरंज्या तयार करून बाजार काबीज करण्याची ईर्षा बाळगणारे लोकप्रिय कथाकार नव्हते तर मंद दिव्याच्या प्रकाशात एकेक टाका घालून अभिजात गुणवत्तेचे गालिचे विणणारे कलावंत होते. म्हणूनच त्यांच्या साहित्यकृतींचे मूल्य कालातीत आहे. जीएंच्या कथा समीक्षेला आव्हान देणाऱ्या आहेत. जीएंनी लोकांतापासून दूर राहत एकांतात साहित्य साधना केली. त्यांनी लिहिलेले पत्रे मराठी साहित्याचा अनमोल ठेवा आहेत. निखळ संवादाचा अभाव आणि प्रतिसादशून्यता यामुळे आज पत्रसंस्कृतीचे वैभव लयाला जात आहे.

महेश आफळे म्हणाले, 'जीएसारख्या अद्भुत लेखकाशी त्यांच्या पश्चात अठ्ठावीस वर्षानंतर मला पत्ररूपी संवाद साधवासा वाटला त्यातून 'जी. ए. पत्रास विनाकारण की' हे पुस्तक लिहिले. अंतःस्वर ऐकून घेणारे हक्काचे ठिकाण मला जीएंच्या साहित्यात भेटले.' अरणकल्ले म्हणाले, 'दुर्बोधतेचा शिक्का अकारण जीएंच्या साहित्यावर मारला गेला त्यामुळे मोठा वाचकवर्ग त्यांच्यासाहित्य ठेव्यापासून दूर राहिला.' या कार्यक्रमात जीएंच्या काजळमाया या कथासंग्रहातील प्रदक्षिणा कथेचे नाट्यरूपांतर सादर केले गेले. जवळीक सोलापूर या संस्थेने या कार्यक्रमाची निर्मिती केली होती. संकल्पना आणि दिग्दर्शन शशिकांत लावणीस यांचे होते वनिता म्हैसकर, अशोक किल्लेदार ओंकार कुलकर्णी, सुहास मार्डीकर, तेजस्विनी चांदणे, शशिकांत लावणीस हे कलाकार त्यात सहभागी झाले होते. संगीत अभिराम सराफ आणि श्रीरंग सराफ यांचे होते. प्रकाश योजना उमेश बटाणे यांची होती. सुमीत फुलमामडी आणि वनिता म्हैसकर यांचे नेपथ्य होते. दीपक करंदीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.