समाजाच्या आत्मिक उन्नतीचे स्वप्न संतांनी पाहिले, चंद्रकांत महाराज वांजळे यांचे मत, सोनोपंत दांडेकर स

पुणे : "समाजाच्या भौतिक प्रगतीमुळे माणसाचे बाह्यजीवन बदलले आहे. पण माणसाला परिपूर्णत्व लाभण्यासाठी त्याचे अंतरंग बदलणे ही तितकेच गरजेचे आहे. समाजाच्या आत्मिक उन्नतीचे स्वप्न संतांनी पाहिले." असे मत ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने कै. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ. यश वेलणकर यांच्या ध्यान-विज्ञान आणि डॉ. संज्योत देशपांडे यांच्या 'अटळ दुःखातून सावरताना' या ग्रंथांना वांजळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, पुरस्कार निवड समितीच्या डॉ. आरती दातार उपस्थित होते.
वांजळे म्हणाले, "प्राचार्य दांडेकर हे लोकशिक्षक होते. त्यांनी कीर्तनसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. लिहिण्यातून आणि बोलण्यातून त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. धर्मग्रंथांचे सार विशद करताना त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन केले."
यश वेलणकर म्हणाले, "ध्यान म्हणजे स्वतःकडे लक्ष देणे. ध्यानाचा धर्माशी आणि परमार्थाशी संबंध जोडल्यामुळे अनेक लोक त्यापासून दूर राहिले. ध्यानामागचे विज्ञान लक्षात घेणे गरजेचे आहे. व्यक्तिमत्त्व परिपूर्ण बनविण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी ध्यान केले पाहिजे."
डॉ. संज्योत देशपांडे म्हणाल्या, दुःखाचा डोंगर कोसळतो तेव्हा माणसे खचून जातात. असे वारंवार घडत राहिले तर माणसांच्या संवेदना बोथट होतात म्हणून अटळ दुःखातून सावरण्याची मानसिकता तयार केली पाहिजे."
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, "संतसाहित्यात केवळ अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्तीचाच विचार नाही त्यात प्रखर प्रवृत्तीवादही आहे. दुःखाचे स्वागत करण्याची भूमिका संतसाहित्य शिकविते. सर्व पातळ्यांवर लढणाऱ्या माणसाचे स्वतःकडे मात्र लक्ष नाही. त्यामुळे व्यक्तिमत्त्व नावाच्या मूल्यांची हानी होत आहे." प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. बंडा जोशींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.