कर्माने भक्ती करणे हाच परमार्थ : ह. भ. प. महेश महाराज नलावडे

साहित्य परिषदेत 'संत सावता माळी' जयंती निमित्त व्याख्यान
पुणे : "कर्म सोडून धर्म घडत नाही. मनुष्य जीवनात कर्म हेच सर्वश्रेष्ठ आहे. कर्म सोडून परमार्थ करणार्यांना सुख लाभत नाही. कर्माने भक्ती करणे हाच खरा परमार्थ आहे." असे मत ह. भ. प. महेश महाराज नलावडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने संत सावंत माळी पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संत सावंत माळी : जीवन आणि विचार हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कृष्णकांत कुदळे उपस्थित होते. नलावडे महाराज म्हणाले, "महाराष्ट्राच्या अध्यात्मिक जीवनात संत सावंत माळी यांनी कृतीतून क्रांती घडवून आणली त्यांनी सारा प्रपंच कृतीतून परमार्थाच्या पातळीवर नेऊन ठेवला त्यांनी भक्तीचे मळे फुलवले. सात्विक भावांची फुले परमेश्वराला अर्पण करण्याची परंपरा निर्माण केली. कर्मवादाचा पुरस्कार करताना संत सावंत माळी यांनी तुकोबांप्रमाणे विरक्त वृत्तीने प्रपंच करावा, असे सांगितले. प्रपंचाच्या मातीतच परमार्थाचे पीक घेता येते असा संदेश त्यांनी सर्वसामान्य माणसांना दिला त्यांचे तत्वज्ञान साधेसोपे आहे. सर्वसामान्य माणसांना समजणारे आहे. प्रपंच सोडून परमार्थाच्या मागे लागणाऱ्या लोकांनी संत सावंत माळी यांचे तत्वज्ञान समजून घेतले पाहिजे. प्रा. जोशी म्हणाले, "जीवनात अनेकदा कर्तव्य कठोर होऊन कर्मसिद्धांताचे आचरण करावे लागते. कर्मामागचा भाव महत्त्वाचा आहे. कर्म निस्पृह भावनेने आणि शुद्ध अंतकरणाने केले की त्याचे कर्मकांडात रूपांतर होत नाही संत सावंत माळी महाराजांनी कोणत्याही उपाधीचा त्याग न करता परमार्थ कसा करता येतो याचा आदर्श वस्तुपाठ आपल्या जीवन चरित्रातून आणि विचारातून घालून दिला आहे. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.